100 वर्षांनंतर देवाचे घर झाले सर्वांसाठी खुले! दलित समाजाला मंदिरात मिळाला पूजेसाठी प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 08:41 AM2023-08-05T08:41:40+5:302023-08-05T08:43:09+5:30
तामिळनाडूमध्ये तब्बल १०० वर्षांनंतर दलित कुटुंबांना मंदिरात प्रवेश मिळाला आहे. तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील चेल्लनकुप्पम गावातील मरियम्मन मंदिरात मोठ्या संख्येने दलित कुटुंबांनी प्रवेश केला.
तिरुवन्नमलाई : देवाचे घर सर्वांसाठी कायम खुले असते. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मागासवर्गीय समाजाला तामिळनाडूतमंदिरात प्रवेश मिळत नव्हता. अखेर त्यांना लढा यशस्वी झाला आहे.
तामिळनाडूमध्ये तब्बल १०० वर्षांनंतर दलित कुटुंबांना मंदिरात प्रवेश मिळाला आहे. तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील चेल्लनकुप्पम गावातील मरियम्मन मंदिरात मोठ्या संख्येने दलित कुटुंबांनी प्रवेश केला. दलितांच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर दलितांनी सांगितले की, देवघरात प्रवेश झाल्याने खूप आनंद झाला आहे.
यावेळी इतर समाजातील लोकांनी दलितांच्या मंदिरात प्रवेशाला विरोध केला नाही. या आंदोलनाची सुरुवात जुलै महिन्यात मंदिर प्रवेशावरून दोन तरुणांमध्ये झालेल्या भांडणातून झाली होती. या दरम्यान दलित आणि वन्नियार यांच्यात अनेक हाणामाऱ्या झाल्या होत्या.
दोन तरुणांपैकी एक दलित, तर दुसरा वन्नियार समाजाचा होता. दोघेही एकाच शाळेत शिकले आणि नोकरीसाठी चेन्नईला गेले होते. दलितांच्या मंदिर प्रवेशाबाबत त्यांनी सर्वप्रथम समाजमाध्यमांवर वाद घातला. नंतर गावात दोघांमध्ये
भांडण झाले.
हवे ते सर्व मिळते...
चेल्लनकुप्पम गावात, बहुतेक नवविवाहित जोडपे मंदिरात प्रार्थना करतात आणि पोंगल शिजवतात. यामुळे त्यांना हवे ते सर्व मिळते, असे मानले जाते. मंदिर प्रवेशामुळे आज आम्ही आनंदी आहोत, असे एका महिलेने सांगितले.
आतापर्यंत काय करत होते?
- तरुणांमध्ये झालेल्या भांडणानंतर दलित समाजातील व्यक्तींनी या प्रकरणाची तक्रार जिल्हा महसूल आणि पोलिस अधिकाऱ्यांकडे केली. त्यांनी मंदिरात प्रवेश करू देण्याची विनंती केली. यानंतर, दलितांनी मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- वेल्लोर रेंजचे डीआयजी एम.एस. मुथुसामी यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलिस बंदोबस्त गावात तैनात करण्यात आला होता. आतापर्यंत दलित समाज कलियाम्मल मंदिरात पूजा करत होते. हे मंदिर ३० वर्षांपूर्वी दलित समाजाने बांधले आहे.