146 दिवसांनंतर सक्रिय रुग्ण 3.63 लाखांपर्यंत घसरले, मृत्यूदर 1.45
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 05:22 AM2020-12-12T05:22:04+5:302020-12-12T05:22:48+5:30
Coronavirus : देशात तब्बल १४६ दिवसांनंतर कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ३.६३ लाखांपर्यंत खाली घसरली आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण ३.७१ टक्के असून, एकूण रुग्णसंख्या ९७.९६ लाखांवर पोहोचली आहे.
नवी दिल्ली : देशात तब्बल १४६ दिवसांनंतर कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ३.६३ लाखांपर्यंत खाली घसरली आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण ३.७१ टक्के असून, एकूण रुग्णसंख्या ९७.९६ लाखांवर पोहोचली आहे. कोरोनातून बरे झालेल्यांचा आकडा ९२.९० लाख असून, ते प्रमाण ९४.८४ टक्के आहे. या आजाराच्या रुग्णांचा मृत्युदर अवघा १.४५ टक्के आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी कोरोनाचे २९,३९८ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ९७,९६,७६९ झाली आहे. एका दिवसातील नव्या रुग्णांची संख्या ३० हजारांपेक्षा कमी आढळून येण्याचा हा या महिन्यातील दुसरा प्रसंग आहे. या आधी ८ डिसेंबरला कोरोनाचे २६,५६७ नवे रुग्ण सापडले होते. देशात कोरोनातून बरे झालेल्यांचा आकडा ९२,९०,८३४ व सक्रिय रुग्णांची संख्या ३,६३,७४९ आहे. शुक्रवारी या संसर्गाने आणखी ४१४ जण मरण पावले व बळींची एकूण संख्या १,४२,१८६ झाली आहे.