पेट्रोल, डिझेल दरवाढीला 17व्या दिवशी ब्रेक; ग्राहकांना फक्त 59 पैशांचा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 07:31 AM2018-05-30T07:31:47+5:302018-05-30T07:31:47+5:30
गेले 16 दिवस पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत होती. मात्र आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे.
मुंबई: पेट्रोल, डिझेल दरवाढीनं त्रस्त झालेल्या जनतेला अखेर दिलासा मिळालाय. गेले 16 दिवस पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत होती. मात्र आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. मात्र ही घट फक्त 59 पैशांची आहे. काल मुंबईत पेट्रोल 86.24 रुपये प्रति लिटर होतं. आज ते 85.65 रुपयांना मिळतंय. तर डिझेलचा दर 73.79 रुपयांवरुन 73.20 रुपयांवर आलाय.
कर्नाटक विधानसभा निवडणूक काळात पेट्रोल, डिझेलची दरवाढ रोखण्यात आली होती. जवळपास तीन आठवडे इंधनाचे दर वाढलेले नव्हते. मात्र कर्नाटकमध्ये मतदान होताच इंधन दराचा भडका उडाला. त्यानंतर सलग 16 दिवस पेट्रोल, डिझेलचे दर वाढत राहिल्यानं त्याची मोठी झळ सर्वसामान्य जनतेला सहन करावी लागली. या दरवाढीला अखेर 16 दिवसांनी ब्रेक लागला. मात्र आजही पेट्रोलचे दर 85 रुपयांच्या वर आहेत.
सतराव्या दिवशी पेट्रोल, डिझेलची दरवाढ थांबल्यामुळे दिल्लीकरांनाही दिलासा मिळणाराय. दिल्लीत पेट्रोल 60 पैशांनी, तर डिझेल 56 पैशांनी स्वस्त झालंय. त्यामुळे दिल्लीत आज पेट्रोलचा दर 77.83 रुपये प्रति लिटर असेल. तर डिझेलचा दर 68.75 रुपये प्रति लिटर इतका असेल. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या खनिज तेलाच्या किमतीत घसरण होतेय. मात्र अद्याप तरी भारतीय तेल कंपन्यांनी इंधन दरात फारशी कपात केलेली नाही. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सामान्य जनता मात्र मेटाकुटीला आलीय.