मृत्यूच्या दाढेतून मिळालं जीवदान; २ महिन्यांनी संक्रमिक रुग्ण पायावर उभा राहिला, डॉक्टर भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 08:06 PM2021-07-01T20:06:05+5:302021-07-01T20:07:56+5:30
६२ दिवसानंतर रुग्ण त्याच्या पायावर उभा राहिला. हे दृश्य पाहून डॉ. टी. के सक्सेना भावूक झाले.
नोएडा – डॉक्टर्स डेच्या निमित्ताने एका डॉक्टरसाठी रुग्ण बरा होणे यापेक्षा सर्वात मोठी भेट काय असू शकते. ही भेट अनमोल असते जेव्हा बरा झालेला रुग्ण डॉक्टरांचे आभार मानतो. कोरोनाच्या काळात अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माणुसकीचं दर्शन घडलं. परंतु सेक्टर ३९ च्या कोविड हॉस्पिटलमध्ये मृत्यूच्या दारात गेलेल्या रुग्णाला डॉ. टी. के सक्सेना यांच्यामुळे जीवदान मिळालं आहे.
६२ दिवसानंतर रुग्ण त्याच्या पायावर उभा राहिला. हे दृश्य पाहून डॉ. टी. के सक्सेना भावूक झाले. डॉक्टर्स डे च्या दिवशी माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठी भेट मिळाल्याचा आनंद डॉक्टरांना झाला. दिल्ली रहिवासी सुनिल कुमार कोरोना संक्रमित असल्याने ३० एप्रिल रोजी कोविड रुग्णालयात दाखल झाले होते. श्वास घेण्यास त्रास, सर्दी, ताप अशी लक्षणं त्यांच्यात दिसत होती. पल्स रेट १३० पर्यत होता तर ऑक्सिजन सेच्युरेशन ६८ पर्यंत आली होती.
व्हेंटिलेटरच्या सपोर्टवरही रुग्णांची ऑक्सिजन पातळी ८० च्यावर गेली नाही. रुग्णाची गंभीर अवस्था पाहून डॉ. रेणू अग्रवाल यांनी आरोग्य अधिकारी डॉ. तृतीय कुमार सक्सेना यांना फोन केला. त्यानंतर डॉ. टी के सक्सेना यांच्या देखरेखीखाली ३० जूनपर्यंत या रुग्णावर उपचार सुरूच होते. डॉक्टर डेच्या दिवशी रुग्णाला एकदम ठणठणीत वाटू लागल्याने त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. सुनीलला रुग्णालयात स्ट्रेचरवरून आणलं होतं. त्यांच्या फुस्फुस्सात गंभीर संक्रमण झालं होतं. तसेच निमोनियाही झाला होता.
निमोनिया वाढल्याने फाइब्रोसिसची समस्या उद्भवली. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. २ महिने या रुग्णाला ऑक्सिजन व्हेंटिलेटरच्या सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. संक्रमण रोखण्यासाठी त्यांना स्टेरॉयड, एँटीबायोटिक औषधं देण्यात आली. जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले तेव्हा संक्रमितांची संख्या ३०० पर्यंत होती. ते ज्या दिवशी भरती झाले त्यातील एकटेच वाचले आहेत. डॉक्टर्स डेच्या दिवशी सुनील बरा होऊन घरी परतला. याचा सर्वात जास्त आनंद त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. टी के सक्सेना यांना झाला.
डॉक्टरांनी दिलं जीवदान, आयुष्यभर विसरणार नाही
कोरोना संक्रमणामुळे औषधांचा प्रभावही कमी पडला. त्यानंतर मला जिवंत ठेवण्यासाठी डॉक्टरांनी प्रचंड मेहनत घेतली. स्वत:च्या कुटुंबाची चिंता करण्याऐवजी डॉक्टर तासनतास वार्डात माझ्या उपचारासाठी बसले होते. माझ्या औषधांवर विशेष लक्ष दिलं जात होतं. आज मी माझ्या पायावर पुन्हा उभा आहे ते केवळ डॉक्टरांमुळे. मी हे कधीच विसरणार नाही असं बरा झालेला रुग्ण सुनील म्हणाला.
लसीकरणाच्या पहिल्या डोसनंतर संक्रमित
डॉ. टी के सक्सेना म्हणाले की, लसीकरणानंतर अनेक लोक निश्चिंतपणे फिरताना दिसतात. सुनीलने कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर १५ दिवसांत संक्रमित झाला. त्याचे जीवन वाचवण्यासाठी डॉक्टरांना अथक प्रयत्न करावे लागले. त्यामुळे लोकांनी मास्क, सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टेंसिंगचं पालन करावं असं आवाहन डॉक्टर सक्सेना यांनी केले आहे.