२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 06:37 PM2024-10-04T18:37:56+5:302024-10-04T18:38:20+5:30
Crime News: हत्येचा बदला हत्या, असं म्हणत आपल्या जवळच्या व्यक्तीच्या हत्येचा बदला घेतल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा वाचल्या असतील. अशा कथा तुम्ही चित्रपटांमधूनही पाहिल्या असतील. दरम्यान, एका मुलाने त्याचा वडिलांच्या हत्येचा तब्बल २२ वर्षांनी बदला घेत आरोपीला सिनेस्टाईलने संपवल्याची घटना गुजरातमध्ये घडली आहे.
हत्येचा बदला हत्या, असं म्हणत आपल्या जवळच्या व्यक्तीच्या हत्येचा बदला घेतल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा वाचल्या असतील. अशा कथा तुम्ही चित्रपटांमधूनही पाहिल्या असतील. दरम्यान, एका मुलाने त्याचा वडिलांच्या हत्येचा तब्बल २२ वर्षांनी बदला घेत आरोपीला सिनेस्टाईलने संपवल्याची घटना गुजरातमध्ये घडली आहे. आरोपी मुलगा त्याच्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तब्बल २२ वर्षे वाट पाहत होता. अखेर २२ वर्षांनंतर तशी संधी चालून येताच त्याने वडिलांची हत्या करणाऱ्या व्यक्तीला ज्या प्रकारे वडिलांची हत्या करण्यात आली होती, त्याच पद्धतीचा अवलंब करून ठार मारले.
हत्येचा बदला हत्या करून घेतल्याची ही घटना अहमदाबाद येथे घडली आहे. तसेच एका ३० वर्षांच्या तरुणाला हत्येच्या प्रकरणात पकडण्यात आल्यानंतर या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला आहे. याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार मंगळवारी ५० वर्षांचा नखट सिंह भाटी हा सायकलवरून जात असताना एका पिकअप टेम्पोने त्याला चिरडले. तो अहमदाबादमधील एका वसाहतीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. ही घटना घडल्यानंतर आरोपी गोपाल सिंह भाटी याने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी त्याला काही अंतरावरच पकडले होते. तसेच पोलिसांनी प्रथम हा अपघात असल्याच्या दृष्टीने तपास सुरू केला होता. तसेच आरोपीवर बेदरकारपणे वाहन चाववून अपघात घडवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
मात्र पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा सखोल तपास केला तेव्हा वेगळंच सत्य समोर आलं. पोलिसांनी सांगितले क, २००२ मध्ये आरोपी गोपाल सिंह भाटी याचे वडील हरी सिंह भाटी यांची राजस्थानमधील जैसलमेर येथे ट्रकखाली चिरडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात नखट सिंह भाटी आणि त्याच्या चार भावांना दोषी ठरवून सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही घटना घडली तेव्हा गोपाल हा आठ वर्षांचा होता. तेव्हापासूनच तो वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याचा विचार करत होता. खून, हत्या याच्या गोष्टी ऐकूनच तो लहानाचा मोठा झाला होता. तसेच बलदा घेण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत होता.
दरम्यान, वडिलांच्या खुन्याची हत्या करण्यासाठी गोलाप यांने मागच्या आठवड्यात बनासकाठा येथील एका गावातून ८ लाख रुपये मोजून एक पिकअप ट्रक खरेदी केला. तसेच तो मागच्या आठवड्यात मृत नखट याच्या घरी सारखा ये-जा करत होता. त्यामुळे तो हत्येपूर्वी आरोपीवर पाळत ठेवून होता, हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, गुन्हा कबूल करताना आरोपीने दोन्ही कुटुंबं आणि त्यांच्या गावांमध्ये असलेल्या वैराची माहिती दिली. आता आरोपी गोपाल याला बोदकदेव पोलिसांकडे सोपवण्यात येणार आहे, तसेच त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.