गायीच्या पोटातून निघालं तब्बल 80 किलो प्लॅस्टिक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 03:16 PM2018-02-20T15:16:07+5:302018-02-20T15:17:39+5:30
13 वर्षांच्या करिअरमध्ये मी पहिल्यांदाच एखाद्या गायीच्या पोटातून एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक काढलं, असं ऑपरेशन करणारे डॉ. जीडी सिंह यांनी म्हटलं.
पटना : बिहारमध्ये एका गायीच्या पोटातून तब्बल 80 किलो प्लॅस्टिकचा कचरा काढण्यात आला आहे. पटनाच्या पशुवैद्यकिय महाविद्यालयातील ही घटना आहे. येथे सहा वर्ष वय असलेल्या एका गायीला आणण्यात आलं होतं. अनेक दिवसांपासून या गायीने खाणं बंद केलं होतं. औषधं-गोळ्यांनीही काही फरक न पडल्याने डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. पण यानंतर जे झालं त्यामुळे डॉक्टरही हैराण झाले. तीन तासांच्या ऑपरेशननंतर गायीच्या पोटातून प्लॅस्टिकचा डोंगर निघाल्यासारखं ते चित्रं होतं असं डॉक्टर म्हणाले. सध्या त्या गायीची प्रकृती स्थिर आहे.
13 वर्षांच्या करिअरमध्ये मी पहिल्यांदाच एखाद्या गायीच्या पोटातून एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक काढलं, असं ऑपरेशन करणारे डॉ. जीडी सिंह यांनी म्हटलं. भारतात गायींनी रस्त्यावर फिरताना प्लॅस्टिक खाणं सामान्य गोष्ट आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक निघणं असामान्य होतं असं डॉ.सिंह म्हणाले. हिंदुस्थान टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे.
भारतात खाण्याच्या शोधात फिरणा-या गायी सामान्यपणे जेथे कचरा गोळा केलेला असतो तेथे जातात. त्यावेळी प्लॅस्टिक गायींच्या पोटात जातं आणि ते जीवघेणं ठरतं. जर वेळीच उपचार झाले तर प्राण्यांचा जीव वाचवता येऊ शकतो, असं सिंह म्हणाले. नागरिकांनी खाण्या-पिण्याच्या गोष्टी किंवा कचरा फेकताना प्लॅस्टिकचा वापर करू नये असं आवाहन सिंह यांनी यावेळी केलं. (फोटो - hindustantimes.com)