बॅंकेला शिकवला धडा , 51 रूपयांच्या बदल्यात द्यावे लागले 9 हजार रूपये
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 12:54 PM2018-02-06T12:54:04+5:302018-02-06T12:57:42+5:30
सरकारी कार्यालयांमध्ये काम होत नाही, स्टेट बॅंकवाल्यांची सेवा चांगली नाहीये या आणि अशा अनेक तक्रारी तुमच्याही असतील पण क्वचितच कोणी त्याविरोधात जाण्याचं पाऊल उचलत असेल.
बंगळुरू : सरकारी कार्यालयांमध्ये काम होत नाही, स्टेट बॅंकवाल्यांची सेवा चांगली नाहीये या आणि अशा अनेक तक्रारी तुमच्याही असतील पण क्वचितच कोणी त्याविरोधात जाण्याचं पाऊल उचललं असेल. पण बंगळुरूचे रहिवासी सईद हुसैनी यांनी हे धाडस दाखवलं आणि स्टेट बॅंक ऑफ इंडियाला चांगलाच धडा देखील शिकवला.
केवळ 51 रूपयांसाठी सईद हुसैनी यांनी बॅंकेविरोधात तीन वर्ष लढा दिला आणि अखेर विजयी ठरले. हुसैनी यांनी स्टेट बॅंकेविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती. कोणतीही कल्पना न देता 51 रूपये खात्यातून कमी करणे आणि खराब सेवा देणे असा त्यांचा बॅंकेवर आरोप होता. अखेर न्यायालयात याबाबत सुनावणी झाली आणि 51 रूपये परत करण्याचा आदेश बॅंकेला दिला. तसंच खराब सेवेमुळे झालेल्या त्रासाबद्दल 5 हजार रूपये आणि खटला लढण्यासाठी झालेला खर्च 4 हजार रूपये सईदला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. thelogicalindian.com ने याबाबत वृत्त दिलं आहे.
कसे खात्यातून गेले 51 रूपये -
सईदने दिलेल्या माहितीनुसार, 25 मे 2015 रोजी त्यांच्या SBI खात्यातून अचानक 51 रूपये कमी झाले. त्यांनी बॅंकेत विचारलं असता, बॅंकेने घरी कुरिअरद्वारे चेकबुक पाठवलं होतं हे सईदला समजलं. चेकबुक घरी पाठवण्याचा पर्याय निवडलाच नव्हता त्यामुळे सईद हुसैनी हैराण झाले. बॅंकेत जाऊनच त्यांनी चेकबुक घेतलं होतं, त्यामुळे 51 रूपये कमी करणं चुकीचं होतं.
51 रूपयांव्यतिरिक्त सईद यांना बॅंकेबाबत अनेक तक्रारी होत्या. 2014 मध्ये 23 सप्टेंबर रोजी त्यांनी 20 हजार रूपये 'ट्विंकल पब्लिक स्कूल'च्या खात्यात ट्रान्सफर केले होते पण तीन दिवसांनंतरही पैसे जमा झाले नव्हते. सईदने त्याबाबत बॅकेला मेल केला होता पण काहीही उत्तर मिळालं नाही. त्यानंतर जवळपास 8 दिवसांनंतर पैसे खात्यात जमा झाले, पण बॅंकेने घडल्या प्रकाराबाबत साधी दिलगीरीही व्यक्त केली नाही.
बॅंकेची खराब सेवा अशाचप्रकारे सुरू होती, पण बॅंकेचे कर्मचारी सुधारण्याचं नाव घेत नव्हते अकेर ग्राहक मंचामध्ये जाण्याचा निर्णय़ घेतला असं सईद यांनी सांगितलं.