३१ वर्षांनी दिव्यांनी उजळली ज्ञानवापी; रात्री उशिरा पूजन, साइन बोर्डवर आता मंदिराचा उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 10:07 AM2024-02-01T10:07:24+5:302024-02-01T10:08:03+5:30
Gyanvapi Case: ज्ञानवापी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, रात्री उशिरा पूजन करण्यात आले.
Gyanvapi Case: ज्ञानवापी परिसरात असलेल्या व्यास तळघरात हिंदूना पूजा करण्याचा अधिकार देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिला. हिंदू पक्षाने ३१ वर्षांनी न्याय मिळाल्याचे सांगत निकालाचे स्वागत केले, तर मुस्लीम पक्षाने याविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. वाराणसी जिल्हा न्यायालयाने निकाल दिल्यानंतर ज्ञानवापीमध्ये रात्री उशिरा पूजन करून दिवे प्रज्ज्वलित करण्यात आले. तसेच येथील मार्गाचे नाव ज्ञानवापी मंदिर करण्यात आले आहे.
नोव्हेंबर १९९३ पर्यंत तळघरात सोमनाथ व्यास तळघरात पूजापाठ करत होते. परंतु, उत्तर प्रदेश सरकारने पुढे त्यावर बंदी घातली. तळघरात पूजेचा अधिकार मिळण्याबाबत शैलेंद्र पाठक यांनी २५ सप्टेंबर २०२३ रोजी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांनी निकाल दिला.
रात्री उशिरा ज्ञानवापीत पूजन
जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांनी पूजा करण्याची जबाबदारी काशी विश्वनाथ ट्रस्टकडे दिली आहे. यानंतर काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी ओम प्रकाश मिश्रा आणि अयोध्येतील रामललाच्या अभिषेकासाठी शुभ मुहूर्त ठरवणारे गणेश्वर द्रविड यांनी व्यास तळघरात पूजा केली. न्यायालयाच्या आदेशानंतर तळघरातील बॅरिकेड्स हटवण्यात आले. यानंतर पूजेसाठी लोकांची गर्दी होऊ लागली. कडेकोट प्रशासकीय सुरक्षा व्यवस्थेत पूजा सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला असून, भाविक व्यास तळघरात जाऊन पूजन करत आहेत. तर, रात्रीच्या वेळी काही तरुणांनी ज्ञानवापीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील साईन बोर्डवर 'ज्ञानवापी मंदिर मार्ग' असे लिहिले. याचा फोटो व्हायरल होत आहे.
दरम्यान, भारतीय पुरातत्व विभागाने केलेल्या पाहणीत ज्ञानवापी परिसरात विष्णू, गणेश मूर्ती तसेच शिवलिंग सापडले. हा परिसर मंदिराच्या ढाच्यावर उभा असल्याचे 'पुरातत्त्व'च्या अहवालात नमूद केले. महामुक्ती मंडप नावाचा शिलालेखही सापडल्याचे अहवालात म्हटले. पूर्वी येथे भव्यदिव्य मंदिर होते. १७च्या शतकात औरंगजेबाने मंदिराचे बांधकाम तोडले. त्यात मोठे फेरबदल करण्यात आल्याचे अहवालात म्हटले. भितींवर कमळ, ३ स्वस्तिक, अन्य मूर्तीसह पशू-पक्षी तसेच धार्मिक चिन्ह आढळून आले. २५ जानेवारी रोजी पुरातत्त्व विभागाचा हा ८३९ पानांचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.