"पूजेचं ताट सजलंय. आरतीचा दिवा जळतोय, राखीसुद्धा आहे. पण...," सुशांतच्या बहिणीचं भावनिक पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 10:35 AM2020-08-03T10:35:31+5:302020-08-03T10:54:09+5:30
सुशांतच्या अकाली जाण्याने दु:खी झालेल्या त्याच्या बहिणीने आज रक्षाबंधनाच्या दिवशी एक भावूक पत्र लिहून आपल्या भावाची आठवण काढली आहे.
मुंबई - बॉलीवडू अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला आता दीड महिन्यांहून अधिक काळ लोटत आला आहे. या काळात सुशांतच्या आत्महत्येचं गुढ दिवसेंदिवस वाढतच चाललं असून, या प्रकरणाच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहारमधील पोलीस आमने-सामने आले आहेत, तसेच दोन्ही राज्यांतील सरकारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, सुशांतच्या अकाली जाण्याने दु:खी झालेल्या त्याच्या बहिणीने आज रक्षाबंधनाच्या दिवशी एक भावूक पत्र लिहून आपल्या भावाची आठवण काढली आहे.
सुशांत सिंह राजपूतची बहीण राणी हिने आज रक्षाबंधनाच्या दिवशी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण आपल्या भावाला राखी बांधू शकणार नाही, याचं दु:ख तिच्या या पत्रातून व्यक्त झालं आहे. या पत्रात ती म्हणते , ‘’आज माझा दिवस आहे, आज तुझा दिवस आहे, आज आपला दिवस आहे. आज रक्षाबंधन आहे. पण पस्तीस वर्षांनंतर पहिल्यांदाच पूजेचं ताट सजलंय. आरतीचा दिवाही जळतोय, हळद-चंदनाचा टिळापण हे. मिठाई आहे, राखीसुद्धा आहे. पण तो चेहरा जवळ नाही आहे, ज्याला ओवाळू शकेन, ते ललाट नाही ज्याच्यावर मी टिळा लावेन, तो हात नाही ज्याच्यावर राखी बांधू शकेन, ते तोंड नाही जे गोड करू शकेन. तो भाऊ नाही ज्याची गळाभेट घेईन.’’
‘’अनेक वर्षांपूर्वी जेव्हा तू आमच्या जीवनाच आला होता तेव्हा आयुष्य उजळून निघाले होते. तू होतास तेव्हा जीवनाच प्रकाशच प्रकाश होता. आता तू या जगात नाही. मला कळत नाही आहे की मी काय करू? तुझ्याशिवाय मला जगता येत नाही आहे. असं कधी होईल, असा विचारही केला नव्हता. हा दिवस येईल पण तू नसशील, असं कधी वाटलं नव्हतं. तुझ्यासोबत राहून अनेक गोष्टी शिकले. आता तुझ्याशिवाय राहणं मी कसं शिकू, तूच सांग,’’
तुझीच
राणी दी
दरम्यान, सुशांतच्या जाण्यामुळे त्याच्या बहिणी आणि कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना दुसरीकडे या आत्महत्या प्रकरणावरून राजकारणही जोरात सुरू आहे. तर तपासावरून मुंबई आणि बिहार पोलीस आमने-सामने आलेले आहेत. तर सुशांतचे कुटुंबीय आपल्याला न्याय आणि सीबीआय तपासाची मागणी करत आहेत.