न्यायाधीशांनी विचारलेल्या 475 प्रश्नांनंतर येदियुरप्पांना अश्रू अनावर
By admin | Published: May 3, 2016 10:44 AM2016-05-03T10:44:48+5:302016-05-03T10:44:48+5:30
कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष येदियुरप्पांना न्यायालयात न्यायाधीशांनी कोट्यवधी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधी प्रश्नांची बरसात केली तेव्हा अश्रू अनावर झाले
Next
>ऑनलाइन लोकमत -
बंगळुरु, दि. 03 - कर्नाटक भाजपा प्रदेशाध्यक्ष येदियुरप्पांना न्यायालयात न्यायाधीशांनी कोट्यवधी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधी प्रश्नांची बरसात केली तेव्हा अश्रू अनावर झाले. बंगळुरुरमधील सीबीआय न्यायालयात येदियुरप्पा यांना हजर करण्यात आले होते. येदियुरप्पा मुख्यमंत्री असताना हा खाण घोटाळा झाला होता. अवैध खाण घोटाळ्याप्रकरणी येदियुरप्पा आणि त्यांच्या नातेवाइकांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.
प्रेरणा ट्र्स्टकडून 20 कोटींची देणगी स्विकारल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने येदियुरप्पा यांना समन्स बजावला होता. अडीच तास झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी येदियुरप्पा यांना 475 प्रश्न विचारले. न्यायाधीशांनी तुम्हाला या प्रकरणावर काही बोलायचे आहे का ? असं विचारताच येदियुरप्पांना भावना अनावर झाल्या. 'मी कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही, जे काही मी केलं आहे ते कायद्याच्या कक्षेत राहूनच केलं आहे', अशी बाजू येदियुरप्पा यांनी न्यायालयात मांडली. माझ्यामुळे कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नसल्याचा दावाही येदियुरप्पांनी यावेळी केला.
न्यायालयाने राजकीय षडयंत्राचे शिकार झाले आहात का विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना येदियुरप्पा खुपच भावनिक झाले, त्यांचा आवाजही जड झाला होता. येदियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने 2008 मध्ये कर्नाटकमध्ये प्रथमच भाजपा सरकार स्थापन केलं होतं.
कर्नाटकमधील अवैध खाण उत्खननाप्रकरणी कर्नाटकचे लोकायुक्त न्यायाधीस संतोष हेगडे यांच्याद्वारा कोट्यवधी रुपयांच्या खाण घोटाळा प्रकरणी त्यांच्या विरोधात अभियोग चालविल्यानंतर येदियुरप्पा यांनी राजीनामा दिला होता. मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्या कुटुंबियांतर्फे चालविण्यात येणाऱ्या एका ट्रस्टला एका माईनिंग कंपनीने 10 कोटी रुपयांचे दान दिले. तसेच या ट्रस्टने एक जमिनीचा तुकडा माईनिंग कंपनीला 20 कोटी रुपयांना विकल्याचे लोकायुक्तांना चौकशीमध्ये आढळून आले होते. येडियुरप्पा यांच्याविरोधात सीबीआय चौकशीचे सुप्रीम कोर्टाचे आदेश दिल्यानंतर सीबीआयने येदियुरप्पा आणि इतर जणांविरोधात गुन्हे दाखल करुन निवास्थानी आणि इतर ठिकाणी छापेमारी केली होती.