मूर्ती निवडताना निकष काय होते?; प्रभू राम त्यांच्या मूळ स्थानी सन्मानाने विराजमान होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 08:27 AM2024-01-22T08:27:16+5:302024-01-22T08:28:05+5:30

देशातील प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात सोहळा

After 500 years of struggle in India, Lord Ram will sit in his native place with love and honor. | मूर्ती निवडताना निकष काय होते?; प्रभू राम त्यांच्या मूळ स्थानी सन्मानाने विराजमान होणार

मूर्ती निवडताना निकष काय होते?; प्रभू राम त्यांच्या मूळ स्थानी सन्मानाने विराजमान होणार

अयोध्या : अनेक वर्षांपासून ५००  वर्षांच्या संघर्षानंतर भारतात प्रभू राम त्यांच्या मूळ स्थानी प्रेम आणि सन्मानाने विराजमान होणार आहेत. हीच भावना देशभरात असल्याने हा सोहळा दिवाळी म्हणून साजरा करण्यात येत आहे. देशातील प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात हा सोहळा साजरा करण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून तात्पुरत्या मंदिरात ठेवण्यात आलेली रामलल्लाची मूर्ती २२ जानेवारी रोजी मंदिरात स्थापन होणाऱ्या नवीन मूर्तीसमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी दिली.

राम मंदिराच्या उभारणीसाठी आतापर्यंत १ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला असून, बांधकाम पूर्ण न झाल्याने ते पूर्ण करण्यासाठी आणखी ३०० कोटी रुपयांची गरज भासू शकते, असेही ते म्हणाले. मंदिराचा एक मजला पूर्ण झाला आहे आणि दुसरा मजला बांधणार आहोत. तीनपैकी एक मूर्ती निवडणे खूप अवघड होते. त्या सर्व अतिशय सुंदर आहेत, सर्वांनी निकषांचे पालन केले, असे ते म्हणाले.

इतर दोन मूर्तींचे काय करणार?
इतर दोन मूर्तींचे काय करणार असे विचारले असता गिरी म्हणाले की, आम्ही त्या पूर्ण सन्मानाने मंदिरात ठेवू. एक मूर्ती आमच्याकडे ठेवली जाईल कारण भगवान श्रीरामांचे वस्त्र आणि दागिन्यांचे मोजमाप करण्यासाठी या मूर्तीची गरज लागेल. रामलल्लांच्या मूळ मूर्तीबाबत गिरी म्हणाले, ही मूर्ती रामलल्लांसमोर ठेवण्यात येणार आहे. मूळ मूर्ती अत्यंत महत्त्वाची आहे. तिची उंची पाच ते सहा इंच असून ती २५ ते ३० फूट अंतरावरून पाहता येणार नाही. त्यामुळे आम्हाला एका मोठ्या मूर्तीची गरज होती.

तरुण अध्यात्माकडे... 
गिरी म्हणाले की, देशातील तरुण अध्यात्माकडे झुकत चालले आहेत. ते बुद्धिजीवी आहेत. ते तार्किक विचार करतात आणि त्यांना वैज्ञानिक पुराव्याची गरज आहे. तरीही ते आध्यात्मिक आणि राष्ट्रीय भावनांमध्ये बुडालेले आहेत. 

मूर्ती निवडताना निकष काय होते? 
मूर्ती निवडताना पहिला निकष मूर्तीचा चेहरा दिव्य तेज असलेला पण लहान मुलासारखा असावा. भगवान राम ‘अजानबाहू’ (ज्या व्यक्तीचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात) होते त्यामुळे हात तितके लांब असावेत. मुलाचा नाजूक स्वभावही आम्हाला दिसत होता, तर दागिनेही अतिशय सुरेख आणि नाजूकपणे कोरलेले होते. यामुळे मूर्तीच्या सौंदर्यात भर पडली.

एम्सच्या ‘ओपीडी’ची अर्धा दिवस सुट्टी रद्द

वादाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ने (एम्स) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सोमवारी दुपारी २:३० वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सेवा बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेतला.‘एम्स’ने शनिवारी ओपीडीमधील कर्मचाऱ्यांसाठी अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर केल्यानंतर त्याला तीव्र विरोध झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा निर्णय मागे घेण्यात आला. ‘एम्स’ने नवीन प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी रुग्णालयाची ओपीडी सुरू राहील.

मंगलध्वनीसाठी ५० वाद्ये एकत्र
देशभरातील पन्नास पारंपरिक वाद्ये अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरात सोमवारच्या अभिषेक सोहळ्याच्या दोन तास अगोदर भक्तिमय 
मंगलध्वनीचा भाग असतील. अयोध्येतील ख्यातनाम कवी यतींद्र मिश्रा यांचे संयोजन असलेल्या या भव्य संगीत सादरीकरणाला नवी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचे पाठबळ आहे. मंदिर ट्रस्टनुसार सकाळी १० वाजता संगीतमय कार्यक्रमाला सुरुवात होईल. दुपारी १२:२० वाजता अभिषेक सोहळा सुरू होईल. 

कोणत्या राज्यांतून काय आले?
काश्मिरी केशर-  काश्मिरी नागरिकांनी राम मंदिरासाठी योगदान म्हणून दोन किलो केशर विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अलोक कुमार यांच्याकडे सुपूर्द केले. त्यांनी ते मंदिर समितीकडे दिले आहे. 

तामिळनाडूची चादर- तामिळनाडूतील कारागिरांनी राम मंदिरासाठी १० दिवस अविरत मेहनत घेत रेशीमची विशेष चादर तयार केली. ती नुकतीच मंदिराकडे सुपूर्द केली.

अलिगडचे कुलूप- तब्बल ४०० किलो वजनाचे कुलूप अलिगडच्या शर्मा दाम्पत्याने राम मंदिरासाठी दान केले. त्याची चावी ३० किलोची आहे.

हैदराबादचे लाडू- नागभूषणम रेड्डी यांनी खास राम मंदिरासाठी १२६५ किलोचे लाडू अयोध्येला पाठविले आहेत.

राजस्थानी ब्लॅंकेट- श्री मेहंदीपूर बालाजी मंदिर न्यासाने लाडूच्या दीड लाख बॉक्ससह ७ हजार ब्लँकेट भाविकांना दान करण्यासाठी मंदिर समितीकडे सुपूर्द केले.

Web Title: After 500 years of struggle in India, Lord Ram will sit in his native place with love and honor.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.