अतूट प्रेम! पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनेही सोडला जीव; 58 वर्षे केला संसार, डोळे पाणावणारी गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 11:10 AM2022-01-03T11:10:49+5:302022-01-03T11:11:58+5:30
पतीच्या मृत्यूनंतर विरहामुळे अवघ्या काही मिनिटांत पत्नीनेही आपला जीव सोडला आहे. काही वेळेच्या अंतराने पती-पत्नीचं निधन झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आपण नेहमीच चित्रपटात अथवा मालिकेत प्रेम कहाणी पाहत असतो. नायकाचा अथवा नायिकेचा मृत्यू झाला की त्याच्या विरहात जोडीदाराचादेखील मृत्यू झाल्याच्या घटना ऐकतो. पण अशीच एक घटना खऱ्या आयुष्यात देखील घडली आहे. एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर काही वेळातच त्याच्या पत्नीचा देखील मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
पतीच्या मृत्यूनंतर विरहामुळे अवघ्या काही मिनिटांत पत्नीनेही आपला जीव सोडला आहे. काही वेळेच्या अंतराने पती-पत्नीचं निधन झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकाच चितेवर दोघांना देखील मुखाग्नी देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या नागोरमध्ये एका वयस्कर दाम्पत्याने तब्बल 58 वर्षे एकत्र राहिल्यानंतर एकत्रित जगाचा निरोप घेतला. एकत्रच दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही मुलींनी आपल्या आई-वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला. त्यानंतर सर्व विधी करीत पार्थिवाला मुखाग्नी दिला.
पतीचा मृतदेह पाहताच पत्नीनेही घेतला जगाचा निरोप
78 वर्षीय वयस्कर व्यक्तीला श्वास घेण्यास अडथळा येत होता. त्यांना आधी एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रविवारी पहाटे 4 वाजता जोधपूरमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह 8 वाजता घरी पोहोचला. पतीचा मृतदेह पाहताच पत्नीनेही जागीच जीव सोडला. पती-पत्नीच्या निधनानंतर त्यांच्या अतूट प्रेमाची परिसरात चर्चा सुरू आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिदेव मंदिरात पूजा-पाठ करणारे राणाराम सेन (78) यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. राणारामची पत्नी भंवरी देवीने (75) पतीचा मृतदेह पाहताच त्यांनीही जागीच जीव सोडला.
एकाच चितेवर दिला दोघांना मुखाग्नी
वयस्कर दाम्पत्याला मुलगा नाही, त्यामुळे मुलींनीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. मुलींची लग्न झाली आहेत. वाजत-गाजत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. ज्यात संपूर्ण गाव सामील झालं होतं. रूण गावाचे निवासी राणाराम सेन यांचं लग्न तब्बल 58 वर्षांपूर्वी भंवरी देवीसोबत झालं होतं. गावकऱ्यांनी सांगितलं की, दोघांमध्ये खूप प्रेम होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.