‘खून’ केलेल्या पत्नीला त्याने ७ वर्षांनी शोधले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 06:10 AM2020-03-05T06:10:09+5:302020-03-05T06:10:12+5:30
गेल्या रविवारी अखेर अभयला इतिश्री सापडली. सोमवारी तिला न्यायालयात उभे केले गेले. तिची जबानी नोंदवून घेतल्यावर खून खटल्यातून अभयला निर्दोष मुक्त करण्यात आले!
केंद्रपाडा (ओदिशा) : पतकुरा गावातील अभय सुतार याच्यावर पत्नी इतिश्री हिचा खून केल्याबद्दल खटला दाखल केला गेला. सात वर्षांपूर्वी महिनाभर तुरुंगात राहिल्यावर त्याची जामिनावर सुटका झाली. तेव्हापासून त्याने ‘खून’ झालेल्या पत्नीला शोधून काढण्याचा ध्यास घेतला होता. गेल्या रविवारी अखेर अभयला इतिश्री सापडली. सोमवारी तिला न्यायालयात उभे केले गेले. तिची जबानी नोंदवून घेतल्यावर खून खटल्यातून अभयला निर्दोष मुक्त करण्यात आले!
चौलिया गावातील अभयचा जवळच्याच समागोला गावातील इतिश्री हिच्याशी विवाह झाला. जेमतेम दोन महिने सासरी राहिल्यावर इतिश्री अचानक घरातून निघून गेली. थोडे दिवस शोध करून अभयने ती बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदविली. दुसरीकडे इतिश्रीच्या वडिलांनी सुरुवातीला तिचा सासरी छळ होत असल्याची व नंतर अभयने तिचा खून करून मृतदेह कुठेतरी टाकून दिल्याची फिर्याद नोंदविली. याच फिर्यादीवरून अभयवर खुनाचा खटला दाखल झाला.
अखेर पुरी जिल्ह्याच्या पिपली गावात अभयला इतिश्री सापडली आणि सात वर्षांचा त्याचा संशय खरा ठरला. इतिश्री राजीव लोचन मोहराना या तिच्या प्रियकरासोबत होती.
इतिश्रीने न्यायालयात दिलेल्या जबानीने तिच्या सात वर्षे गायब होण्याचा उलगडा झाला. अभयशी लग्न होण्याआधीपासून इतिश्री व राजीव लोचन यांचे प्रेमसंबंध होते; पण घरच्यांनी तिचे अभयशी जबरदस्तीने लग्न लावून दिले. एक दिवस संधी साधून ती सासरच्या घरातून रात्री गुपचूप बाहेर पडली. राजीव लोचनशी तिने पळून जाऊन लग्न केले. दोघे सात वर्षे गुजरातमध्ये राहिले. या दरम्यान त्यांना दोन मुलेही झाली. आता सर्व सामसूम झाले असेल, असे समजून दोघेही मुलांना घेऊन पुन्हा ओदिशात आले व पिपली गावात राहू लागले. राजीव लोचन भुवनेश्वरमध्ये रिक्षा चालवून कुटुंबाची उपजीविका चालवितो. (वृत्तसंस्था)
>निर्दोष ठरल्याचे समाधान
अभय म्हणतो, माझा इतिश्रीवर राग नाही. तिने मला आधी सांगितले असते तर मी तिच्याशी लग्न केलेही नसते. इतिश्रीचा खून झालेला नाही, या माझ्या सांगण्यावर कोणी विश्वासही ठेवायला तयार नव्हते.
शेवटी जामिनावर सुटून बाहेर आल्यावर मीच तिला शोधण्याचे ठरविले. ती सापडली आणि मी निर्दोष ठरलो, याचेच मला समाधान आहे.