नक्षल प्रभावित गावात स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतर पोहोचली वीज, ग्रामस्थ भावूक, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 04:46 PM2023-08-16T16:46:21+5:302023-08-16T16:46:55+5:30
Electricity reached the Naxal-Affected Villag: छत्तीसगडमधील सुकमा जिल्हा हा नक्षलवादी कारवायांमुळे संवेदनशील समजला जातो. मात्र आता येथे विकासाची एक नवी कहाणी लिहिली जात आहे. सुकमा जिल्ह्यातील नक्षलग्रस्त एलमागुंडा गावातील ग्रामस्थांना यंदाच्या स्वातंत्र्य दिनी एक खास भेट मिळाली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा जिल्हा हा नक्षलवादी कारवायांमुळे संवेदनशील समजला जातो. मात्र आता येथे विकासाची एक नवी कहाणी लिहिली जात आहे. सुकमा जिल्ह्यातील नक्षलग्रस्त एलमागुंडा गावातील ग्रामस्थांना यंदाच्या स्वातंत्र्य दिनी एक खास भेट मिळाली आहे. या गावामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे लोटल्यानंतर वीज पोहोचली आहे. घरात पहिल्यांदा उजेड पडल्यानंतर ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
छत्तीसगड सरकारच्या धोरणानुसार राज्य सरकारच्या विकास, विश्वास आणि सुरक्षेच्या थीमवर काम करत जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस आणि सीआरपीएफच्या अथक प्रयत्नांमुळे एलमागुंडा गावामध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा विजेची सेवा पोहोचली आहे.
नक्षल प्रभावित एलमागुंडा गावामध्ये वीज पोहोचल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. एलमागुंडा गावामध्ये यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरक्षा दलांचा कॅम्प स्थापन करण्यात आला होता. तेव्हापासून गावात पायाभूत सुविधा पोहोचवण्यासाठी सीआरपीएफ, जिल्हा पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे प्रयत्न सुरू केले होते. तसेच आता गावामध्ये वीज पोहोचल्यामुळे शासन आणि प्रशासनावरील विश्वासही वाढला आहे.
सुकमा जिल्ह्यामधील काही गाव हे नक्षल प्रभावित आणि संवेदनशील आहेत. त्यामुळए सुरक्षा दलाच्या जवानांकडून प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमधून ग्रामस्थांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्याअंतर्गत ग्रामीण भागामध्ये कॅम्प स्थापन करण्यासह त्या भागांमध्ये लोकांच्या आवश्यक गरजा पोहोचवण्याचं कामही केलं जात आहे.