२० एप्रिलनंतर शेतीची कामे, ग्रामीण उद्योगांसह औद्योगिक वसाहती सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 06:21 AM2020-04-16T06:21:52+5:302020-04-16T06:22:04+5:30
केंद्राकडून मार्गदर्शिका जारी : सोशल डिस्टन्सिंग पाळणे असेल अनिवार्य
नवी दिल्ली : कोरोनासंबंधीची सर्व पथ्ये पाळून समाजातील काही वर्गांची रोजीरोटी पुन्हा सुरू व्हावी आणि अत्यावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठाही अव्याहत सुरू राहावा यासाठी वाढीव ‘लॉकडाउन’च्या काळात २० एप्रिलनंतर काय सुरू राहील व बंद असेल याची सविस्तर मार्गदर्शिका केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना पाठविली.
नंतर कॅबिनेट सचिवांनी सर्व राज्यांचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांची व्हिडीओ बैठक घेतली. पंतप्रधानांचे प्रधान सचिव, गृहसचिव व आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांखेरीज सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त व सर्व जिल्ह्यांचे सिव्हिल सर्जनही बैठकीस उपस्थित होते.
या सेवा, उद्योगांना असेल परवानगी
शेती उद्योग, मनरेगा
अत्यावश्यक अशा सर्व प्रकारच्या मालाची वाहतूक
शेतमालाची खरेदी-विक्री, शेतमालाच्या बाजार समित्या व मंडयांमध्ये विक्री
खते, खते, कीटकनाशके व बी-बियाणांचे उत्पादन,
मासेमारी, दूध व दुग्धजन्य पदार्थ, पशुपालन, कुक्कुटपालन
चहा, कॉफी व रबराचे मळे
‘मनरेगा’ची कामे (यात जलसिंचन व जलसंधारण कामांना प्राधान्य) व ग्रामीण भागांतील सामायिक सेवा केंद्रे
अन्नप्रक्रिया उद्योग, ग्रामीण भागांतील उद्योग, रस्त्यांची कामे, पाटबंधारे प्रकल्प कामे, ग्रामीण भागांत घरांचे व औद्योगिक बांधकाम
खनिज तेल, आयटी उद्योग
एसईझेड, निर्यात प्रोत्साहन क्षेत्रे व औद्योगिक वसहत
हार्डवेअर, पॅकिंगसाठी लागणारे सामान
ई कॉमर्स, आयटी व आयटीआधारित सेवा उद्योग, सरकारी कामासाठी डेटा व कॉल सेंटर
बँका, आरोग्य सेवा, वर्तमानपत्रे
आरोग्य सेवा, सामाजिक सेवा, ग्राहकोपयोगी सेवा
रिझर्व्ह बँक, इतर बँका, विमा कंपन्या, शेअर बाजारांशी संबंधित संस्था.
कोळसा व अन्य खनिजांच्या खाणी तसेच खनिज तेलाचे उत्पादन.
पोस्ट आॅफिसेस. कुरिअर सेवा, वर्तमानपत्रे
हे मात्र सर्व बंदच राहील
मेट्रो व लोकलसह रेल्वेची सर्व प्रवासी वाहतूक
रस्ता मार्गाने होणारी खासगी
व सार्वजनिक प्रवासी वाहतूक
टॅक्सी, रिक्षा व ओला-उबरसारख्या अॅपआधारित प्रवासी सेवा
देशांतर्गत सर्व विमान वाहतूक
सामाजिक, राजकीय, क्रीडाविषयक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक यासह
गर्दी होईल असा अन्य कोणताही कार्यक्रम
विशेष परवानगी दिलेल्यांखेरीज अन्य व्यावसायिक व औद्योगिक आस्थापने
सर्व शाळा, कॉलेजे, विद्यापीठे, अन्य प्रशिक्षण संस्था व कोचिंग क्लास
सर्व धार्मिक
व प्रार्थनास्थळे
वैद्यकीय कारणाखेरीज लोकांचे आंतरजिल्हा
व आंतरराज्य येणे-जाणे
विशेष परवानगी दिलेल्यांखेरीज सर्व निवासी हॉटेल, लॉज, बोर्डिंग हाऊस व वसतिगृहांसह ‘हॉस्पिटॅलिटी’ उद्योग
सर्व चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सेमिनार स्थळे, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा व जिम, स्वीमिंग पूल, उद्याने, थीम पार्क, बार आणि उपाहारगृहे
अंत्ययात्रेला जास्तीत जास्त २० लोकांना परवानगी
अधिक कडक निर्बंध : जाहीर केलेले ‘हॉटस्पॉट’ वा वेगाने संसर्ग होत असलेले घोषित ‘कन्टेन्मेंटझोन’मध्ये इतर ठिकाणांपेक्षा कडक निर्बंध असतील. येण्या-जाण्यास पूर्ण मज्जाव असेल.
यामुळे शेतकरी आणि विशेषत: ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. परंतु या सेवा सुरू ठेवताना तसेच संबंधित
कार्यालयांमध्ये काम करताना सर्वांना सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनासंबंधीची अन्य बंधने पाळणेही अनिवार्य असणार आहे.