अखेर चीनने डोकलाममध्ये लष्करी साम्राज्य उभे केलेच! सॅटलाईट फोटोंमधून झाला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 09:33 AM2018-01-18T09:33:27+5:302018-01-18T09:52:26+5:30
भारत आणि चीनमध्ये डोकलामवरुन निर्माण झालेला संघर्ष संपून आता पाच महिने उलटले आहेत. पण या काळात चीन अजिबात शांत बसून नव्हता.
नवी दिल्ली - भारत आणि चीनमध्ये डोकलामवरुन निर्माण झालेला संघर्ष संपून आता पाच महिने उलटले आहेत. पण या काळात चीन अजिबात शांत बसून नव्हता. भारत आणि चीनमध्ये डोकलाममधल्या ज्या भागावरुन वाद होता तिथून दोन्ही देशांनी आपआपले सैन्य मागे घेतले पण चीनने त्यांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशामध्ये सुसज्ज असा लष्करी तळ उभा केला आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.
भूतान डोकलाममधील ज्या भागावर आपला दावा सांगत आहे तिथेच चीनने लष्करी साम्राज्य उभे केले आहे. सॅटलाईट फोटोंमधून चीनच्या या लष्करी तळाचा खुलासा झाला आहे. डोकलाम पठाराच्या भागात चीनने विस्तीर्ण असे रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. हेलिपॅड उभारले आहेत. वादग्रस्त भागात पूर्व आणि पश्चिमेला अनेक लष्करी तळ उभे केले आहेत.
या सॅटलाईट फोटोंमध्ये चीनचा शस्त्रसाठा, तोफा कुठेही दिसलेल्या नाहीत. पण काही भागांमध्ये खोदकाम करण्यात आले असून तिथे तोफा आणल्या जाऊ शकतात. चीन या भागात आपली घातक शस्त्रास्त्रे तैनात करु शकतो याचीच भारताला सुरुवातीपासून चिंता आहे.
सिक्कीमच्या डोका ला भागात भारताची पोस्ट आहे. चीनच्या लष्करी तळापासून फक्त 81 मीटर अंतरावर ही पोस्ट आहे. युद्धाच्या प्रसंगात भारताची ही पोस्ट सहज चीनच्या टप्प्यात येईल.
काही दिवसांपूर्वीच झी न्यूजने गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने डोकलाममधल्या वादग्रस्त भागाच्या मागच्या बाजूला चीनने 400 मीटर उंचीची भिंत उभारल्याचे वृत्त दिले होते. आपण काय करतोय याची कुणालाही खबर लागू नये यासाठी चीनने ही भिंत बांधली आहे. चीनकडून या भागात मोठया प्रमाणावर बांधकाम सुरु आहे तसेच मोठया संख्येने चिनी सैनिक इथे तैनात करण्यात आले आहेत. सैनिकांना सामावून घेण्यासाठी 16 बराक बांधण्यात आले आहेत. सहा बोगदे बांधण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. चिनी सैन्याच्या 23 ते 27 शेडस असून 200 पेक्षा जास्त तंबू ठोकण्यात आले आहेत. भारतीय सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी टेहळणी उपकरणेही बसवण्यात आली आहेत.
म्हणून निर्माण झाला संघर्ष
16 जूनपासून डोकलाममध्ये भारत आणि चीन संघर्षाला सुरुवात झाली होती. 73 दिवस दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर होते. भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमा डोकलाममध्ये जिथे मिळतात त्या भागाला ट्राय जंक्शन म्हणतात. चीनने त्या ट्राय जंक्शनजवळ रस्ता बांधणीचे काम सुरु केल्यामुळे संघर्षाला सुरुवात झाली होती. कारण चीनने जर इथे रस्ता बांधला असता तर भारताचा रणनितीक दृष्टया महत्वाचा भूप्रदेश चीनच्या टप्प्यात आला असता.