पाक अखेर ताळ्यावर!
By admin | Published: January 8, 2016 03:57 AM2016-01-08T03:57:24+5:302016-01-08T03:57:24+5:30
पठाणकोट हल्ल्यात पाकिस्तानी अतिरेक्यांचा सहभाग असल्याची गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेली माहिती आम्ही पुरविली आहे, आता तडकाफडकी निर्णायक कारवाई करा, त्यावरच चर्चा निर्भर राहील
इस्लामाबाद/नवी दिल्ली : पठाणकोट हल्ल्यात पाकिस्तानी अतिरेक्यांचा सहभाग असल्याची गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेली माहिती आम्ही पुरविली आहे, आता तडकाफडकी निर्णायक कारवाई करा, त्यावरच चर्चा निर्भर राहील, असे भारताने ठणकावल्यानंतर अखेर पाकिस्तान ताळ्यावर आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन भारताने दिलेल्या माहितीवर वेगाने काम करण्याचे फर्मान पाकिस्तानी अधिकाऱ्यांना सोडले.
शरीफ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दूरध्वनीवर बोलणे झाल्यानंतर भारताने पाकला तातडीने व निर्णायक कारवाईची आम्ही वाट बघत आहोत, असे म्हटले होते. शिवाय अमेरिकेनेही पाकने दिलेला शब्द पाळावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत दबाव टाकला होता.
शरीफ यांनी बोलाविलेल्या या बैठकीत राष्ट्रीय आणि विभागीय सुरक्षेवर चर्चा झाली, असे पंतप्रधानांच्या कार्यालयाने गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. बैठकीनंतर, भारताने पठाणकोट हल्ल्यासंदर्भात जी माहिती पाकला दिली त्यावर चर्चा होऊन त्याआधारे वेगाने काम करण्यास सांगण्यात आले. पठाणकोट हल्ल्यामध्ये सहभाग आढळणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे, असेही त्याने सांगितले. मात्र आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारताने दिलेली माहिती केवळ दूरध्वनी क्रमांक असून ती पुरेशी नाही व पाकने भारताकडे आणखी माहिती मागवली आहे.
पाकिस्तानने ठोस कारवाई करावी असे भारताने म्हटले असले तरी त्यासाठी कालमर्यादा ठरवून दिली नाही. पठाणकोट येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे सीमापार दहशतवादी कारवायांकडे नव्याने लक्ष वेधले गेले आहे. चेंडू पाकिस्तानच्या अंगणात आहे.
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करताना ठोस कारवाई करण्याचे सुचविले आहे. शरीफ यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिले आहे. आम्हाला त्यांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा आहे, असे स्वरूप यांनी नमूद केले.
लाहोर भेटीमुळे सकारात्मक वातावरण
पंतप्रधान मोदी यांनी गेल्या महिन्यात लाहोरला भेट दिल्यानंतर दोन देशांच्या संबंधांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. पठाणकोट येथील हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर ठोस कारवाई केली जावी, यासाठी भारत प्रयत्नशील राहील, असेही ते म्हणाले.- आणखी वृत्त/१०
पठाणकोट हवाई तळावर झालेल्या हल्ल्याचे मूळ पाकिस्तानात असल्याचे स्पष्ट होताच इस्लामाबाद येथे १५ जानेवारी रोजी विदेश सचिव एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे समकक्ष अझीझ अहमद चौधरी यांच्यासोबत होणारी चर्चा अनिश्चिततेच्या फेऱ्यात अडकल्याचे संकेत मिळाले आहेत.
विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी पत्रकार परिषदेत भारताची भूमिका स्पष्ट केली; मात्र पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार करूनही त्यांनी चर्चा होणार की नाही याबाबत भाष्य टाळले.
सचिव स्तरावरील चर्चेपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावर चर्चा करणार काय, या मुद्द्यावर ते म्हणाले की, याबाबत पाकिस्तानशी अद्याप चर्चा झालेली नाही. पाकिस्तानसोबतच्या विदेश धोरणात सातत्याचा अभाव असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. -आणखी वृत्त/१२