अखेर 'फवाद' बोलला, पण उरीचा 'वाद' टाळला
By admin | Published: October 7, 2016 06:50 PM2016-10-07T18:50:05+5:302016-10-07T18:54:01+5:30
उरी दहशतवादी हल्ल्यावर एक शब्दही न काढणा-या पाकिस्तानी अभिनेता फवाद खानने अखेर यासंबंधी बोलला आहे. फवाद खानने फेसबूकच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - उरी दहशतवादी हल्ल्यावर एक शब्दही न काढणा-या पाकिस्तानी अभिनेता फवाद खानने अखेर यासंबंधी बोलला आहे. फवाद खानने फेसबूकच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे, मात्र उरी हल्ल्याचा उल्लेख करणं त्यानं टाळलं आहे.
माझी पत्नी गरोदर असल्याने जुलै महिन्यापासून मी लाहोरमध्ये आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडत असलेल्या घटनांवर प्रतिक्रिया देण्यासाठी मला अनेक प्रसारमाध्यमं आणि लोकांनी विचारलं. दोन मुलांचा पिता असल्याच्या नात्याने आपण त्यांच्यासाठी एक शांततापूर्ण जगाची निर्मिती करायला हवी अशी प्रार्थना करतो. उद्या या जगात वावरणा-या मुलांना आपण हे देणं लागतो असं फवाद खानने लिहिलं आहे.
तसंच आपण या मुद्यावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे. आपण याअगोदर काहीच वक्तव्य केलं नसून त्याच्याशी आपला काहीच संबंध नसल्याचं त्याने सांगितलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या दहशतवादी हल्ल्यानंतर हे सर्व सुरु झाले त्या हल्ल्याचा उल्लेख करणंही फवादने टाळलं. उरी हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांना विरोध करत 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता.
उरी येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्शवभूमीवर माध्यम क्षेत्रातील आघाडीचा समूह असलेल्या ' झी' समूहाने ' जिंदगी' चॅनेलवरील पाकिस्तानी मालिकांवर बंदी टाकण्याचा निर्णय घेतला. ' हा निर्णय म्हणजे आपल्या देशावर सतत होणा-या दहशतवादी हल्ल्यांबदल निषेध नोंदवण्याचा एक प्रयत्न होता' असे 'झी' व ' एस्सेल' समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्र गोयल यांनी स्पष्ट केले होते. ' या (उरी) हल्ल्याबद्दल शोक व्यक्त करण्याची विनंती आम्ही पाकिस्तानी कलाकारांना केली होती, मात्र असे करण्यास त्यांनी नकार दिला' असेही गोयल यांनी नमूद केले होते.