अखेर धुमश्चक्री थांबली
By admin | Published: February 23, 2016 12:39 AM2016-02-23T00:39:01+5:302016-02-23T00:39:01+5:30
जम्मू-काश्मीरच्या पाम्पोर येथे एका शासकीय इमारतीत गेल्या तीन दिवसांपासून दडून बसलेल्या तीन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाने खात्मा केला असून यासोबतच गेल्या ४८ तासांपासून सुरू
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पाम्पोर येथे एका शासकीय इमारतीत गेल्या तीन दिवसांपासून दडून बसलेल्या तीन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाने खात्मा केला असून यासोबतच गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेली चकमक संपली आहे. दरम्यान कुठल्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नसली तरी हे लष्कर-ए-तोयबाचे कृत्य असावे असा अंदाज केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक प्रकाश मिश्रा यांनी वर्तविला आहे.
उद्योजकता विकास संस्थेच्या पाच मजली इमारतीत लपून बसलेल्या तीनही दहशतवाद्यांंंना कंठस्नान घालण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी दिली. लष्करी अधिकाऱ्यानेही याला दुजोरा दिला आहे. मृत दहशतवाद्यांजवळून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. ४४ खोल्या असलेल्या या इमारतीत स्फोटके आणि शस्त्रास्त्रांचा शोध अजूनही सुरू आहे. मृत दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. गेल्या शनिवारी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हल्ला केल्यानंतर हे दहशतवादी या इमारतीत लपले होते. या हल्लात दोन जवान शहीद तर एका असिस्टंट कमांडेंटसह १३ जवान जखमी झाले होते आणि त्यानंतर उडालेल्या चकमकीत लष्कराचे दोन कॅप्टन आणि एक लान्सनायकही शहीद झाले. जीओसी १५ कॉर्पचे लेफ्टनंट जनरल एस.के. दुवा यांनी दुपारी इमारत फार मोठी असल्याने मोहिमेस विलंब होऊ शकतो,असे सांगितले होते. रविवारी रात्रभर आणि आज सकाळी थोड्याथोड्या वेळाने गोळीबार सुरू होता. दिवस उजाडताच सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरुद्ध तीव्र मोहीम सुरू केली होती. दरम्यान पम्पोर आणि आजूबाजूच्या परिसरात झालेली निदर्शने लक्षात घेता हा संपूर्ण भाग सील करण्यात आला आहे. भुसुरुंग स्फोटात जवान जखमी जम्मू- जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्णात आंतरराष्ट्रीय सीमेवर भुसुरुंग स्फोटात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान जखमी झाला.पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जखमी हेड कॉन्स्टेबल उझान बारा आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत सीमेवर गस्त घालत असताना हा स्फोट झाला. जखमी जवानावर इस्पितळात उपचार सुरू आहेत.
दोन शहीद जवानांवर अंत्यसंस्कार
जिंद/ जम्मू : काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्णात अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेले २३ वर्षीय कॅप्टन पवनकुमार आणि कॅप्टन तुषार महाजन यांना सोमवारी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.
पवनकुमार यांचे पार्थिव हरियाणातील जिंदजवळील बेढाणा या जन्मगावी नेले जात असताना जाट निदर्शकांना मार्ग मोकळा करण्याचे आवाहन लष्कर आणि राज्य सरकारने केले होते. कॅप्टन तुषार महाजन यांचे पार्थिव मूळगावी नेण्यापूर्वी लष्करी अधिकाऱ्यांनी जम्मू येथे पुष्पचक्र अर्पण करीत आदरांजली अर्पण केली. त्यावेळी तुषार यांचे माता-पिता उपस्थित होते.
पाच पोलीस जखमी
जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्णात हिमाचल प्रदेशातील एका संशयित गुन्हेगाराच्या समर्थकांनी केलेल्या दगडफेकीत किमान पाच पोलीस जखमी झाले. पोलीस अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार चोरीच्या आरोपातील फरार गुलजार हुसेन याच्या समर्थकांनी ही दगडफेक केली. हिमाचल प्रदेश पोलिसांचे एक पथक त्याला अटक करण्यासाठी सोमवारी येथे आले होते.