अमित शहा यांनी बैठक घेताच यूपी सरकारही लागले कामाला! 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 05:22 AM2020-11-19T05:22:03+5:302020-11-19T05:25:02+5:30

कोरोना : दिल्ली-नोएडा सीमेवर कोरोना तपासणीचे विशेष अभियान

after Amit Shah's meeting, the UP government also started working! | अमित शहा यांनी बैठक घेताच यूपी सरकारही लागले कामाला! 

अमित शहा यांनी बैठक घेताच यूपी सरकारही लागले कामाला! 

Next

विकास झाडे
    लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक घेतली. त्यानंतर लगेच उत्तर प्रदेश सरकारनेही दिल्लीच्या सीमेवर बुधवारपासून कोविड-१९ ची तपासणी सुरू केली आहे. शनिवारपासून दररोज १ लाख २० हजार तपासण्या करण्याचा केंद्र आणि दिल्ली सरकारचा संकल्प आहे.


दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून, प्रत्येक १५ मिनिटाला सरासरी एका रुग्णाचा मृत्यू होत आहे. संपूर्ण देशात मरण पावणाऱ्या प्रत्येक पाच रुग्णांपैकी एक रुग्ण दिल्लीतील असल्याची नोंद होत आहे. 


कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेल्यामुळे अमित शहा आणि अरविंद केजरीवाल यांच्या बैठकीत व्यापक पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीमध्ये उत्तर प्रदेश आणि हरियाणातूनही मोठ्या संख्येने लोक नोकरीसाठी येतात. त्यामुळे आजपासून उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या सीमेवर तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत. शनिवारपासून दिल्लीत चार मोबाईल व्हॅन मोहल्ल्यामोहल्ल्यात फिरणार असून, तपासणी केली जाईल.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नोएडा-दिल्लीच्या सीमेवर कोरोना तपासण्या केल्या जात आहेत. आरोग्य विभागाच्या पुढील अहवालाच्या आधारे कोरोना तपासण्यांचे अभियान सुरू ठेवण्यासंबंधी निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

लग्नाला आता ५० लोक! 
टाळेबंदीच्या काळात लग्नांमध्ये केवळ ५० लोकांना उपस्थित राहण्याचा आदेश काढण्यात आला होता. 
त्यानंतर कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यानंतर ही संख्या २०० वर नेण्यात आली; परंतु दिल्लीतील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आजपासून लग्नसमारंभात केवळ ५० लोकांना हजर राहता येईल. 
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भात नायब राज्यपालांकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला होता. तो मंजूर करण्यात आला.
 

Web Title: after Amit Shah's meeting, the UP government also started working!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.