नोटाबंदीनंतर सेकर रेड्डीकडे नव्या नोटांमध्ये 33 कोटी 60 लाख रुपये कुठून आले ? - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 11:41 AM2017-10-26T11:41:26+5:302017-10-26T12:59:42+5:30
आठ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर संपूर्ण देश रांगेत उभा होता.
मुंबई - आठ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर संपूर्ण देश रांगेत उभा होता. सर्वसामान्य लोकांना पैसा मिळत नव्हता. पण एक महिन्याने आठ डिसेंबर 2016 रोजी कर्नाटकातल्या सेकर रेड्डीकडे 2000 च्या नव्या नोटेमध्ये 33 कोटी 60 लाख रुपये सापडले. इतका पैसा रेड्डीकडे आला कुठून ? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आहे. आजतक वृत्तवाहिनीच्या मंथन कार्यक्रमामध्ये बोलताना राज ठाकरेंनी नोटाबंदी, बुलेट ट्रेन, निवडणुकीत भाजपाकडून होणारा पैशांचा वापर या मुद्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर सडकून टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय का घेतला ? ते मला अजूनही समजलेले नाही. जुन्या नोटांमधील 99 टक्के नोटा परत आल्या असे आरबीआय सांगत असेल मग बनावट नोटा, काळा पैसा कुठे गेला ?, नोटाबंदीचा काय उपयोग झाला ? असे सवाल राज यांनी विचारले.
भाजपाला सध्या भरपूर लोक डोनेशन देतायत या मुलाखतकाराच्या प्रश्नावर त्यांनी देणगी आणि दरोडा यात खूप फरक असतो असे सूचक विधान त्यांनी केले. बुलेट ट्रेनची एक वीट रचू देणार नाही या आपल्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. देशाची रेल्वे व्यवस्था सुधारण्यासाठी एक लाख कोटींची गरज आहे. मग अस असताना बुलेट ट्रेनसाठी 1 लाख 10 हजार कोटीचं कर्ज का काढायचं? असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. एका राज्यासाठी संपूर्ण देशावर बुलेट ट्रेनच ओझ कशाला ? असा सवाल राज यांनी विचारला.
आजच्या घडीला देशात भाजपाकडे भरपूर पैसा आहे. निवडणुकीत भाजपाने अमाप पैसा खर्च केला आहे असे राज म्हणाले. प्रसारमाध्यमांवरही त्यांनी हल्लाबोल केला. पत्रकार, संपादक वेगळे बोलतात, चॅनलच्या मालकांची भाषा वेगळी आहे. चॅनलच्या मालकांचे हात दगडाखाली आहेत असे राज ठाकरे म्हणाले.