अरुणाचल, मणिपूरनंतर या राज्यात भाजपाने दिला नितीश कुमारांना धक्का, जेडीयूच्या अस्तित्वालाच लावला सुरुंग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 10:30 AM2022-09-13T10:30:13+5:302022-09-13T10:30:48+5:30
Nitish Kumar: बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपासोबतची आघाडी मोडून महागठबंधनमध्ये पुन्हा प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपाला बिहारमधील सत्तेतून बाहेर पडावे लागले होते. दरम्यान, या घडामोडींनंतर नितीश कुमार आणि जेडीयूला धक्का देण्याचा चंग भाजपाने बांधला आहे.
नवी दिल्ली - बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपासोबतची आघाडी मोडून महागठबंधनमध्ये पुन्हा प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपाला बिहारमधील सत्तेतून बाहेर पडावे लागले होते. दरम्यान, या घडामोडींनंतर नितीश कुमार आणि जेडीयूला धक्का देण्याचा चंग भाजपाने बांधला आहे. दरम्यान, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्ये जेडीयूला धक्का दिल्यानंतर आता भाजपाने जेडीयूच्या दमण आणि दीवमध्येही जेडीयूच्या अस्तित्वाला सुरुंग लावला आहे. जेडीयूची दमण दीवमधील संपूर्ण युनिटच भाजपामध्ये दाखल झाली आहे.
भाजपाने यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे. भाजपाने लिहिले की, दमण आणि दीव जेडीयूच्या १७ जिल्हा परिषद सदस्यांपैकी १५ आणि राज्य जेडीयूचं संपूर्ण यूनिट भाजपामध्ये दाखल झालं आहे. हे सर्व नेते आणि कार्यकर्ते नितीश कुमार यांनी भाजपासोबतची आघाडी मोडल्याने नाराज आहेत, असा दावाही भाजपाकडून करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशमध्ये जेडीयूचे अनेक आमदार भाजपामध्ये दाखल झाले होते. तर मणिपूरमधील जेडीयूच्या ७ पैकी ५ आमदारांनी हाती कमळ घेतले होते. भाजपाने याचवर्षी झालेल्या निवडणुकीत ६० पैकी ३२ जागा जिंकल्या होत्या. दरम्यान २५ ऑगस्ट रोजी अरुणाचल प्रदेशमधील जेडीयूचा शेवटचा खासदारही भाजपात दाखल झाला होता. त्यावेळी भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू उपस्थित होते.