तामिळनाडू तुझा भाजपावर भरोसा हाय काय ?
By वैभव देसाई | Published: August 3, 2017 02:08 PM2017-08-03T14:08:39+5:302017-08-03T14:40:46+5:30
तामिळनाडूमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत भाजपाचं 120 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं असून, त्यासाठी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे.
चेन्नई, दि. 3 - देशात भाजपाचा वारू सद्यस्थितीत चौफेर उधळला आहे. पूर्वेपासून ते उत्तर भारतातील अनेक राज्यांत भाजपानं सत्ता स्थापन करत दबदबा निर्माण केला आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंडपाठोपाठ भाजपानं नितीश कुमारांच्या मदतीनं बिहारमध्ये सत्ता काबिज केली. त्यानंतर भाजपानं आता दक्षिण भारताकडे मोर्चा वळवला आहे. तामिळनाडूमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत भाजपानं 120 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं असून, त्यासाठी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे.
तामिळनाडूमध्ये माजी मुख्यमंत्री राहिलेले एम. करुणानिधी यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकारणातून आधीच निवृत्ती घेतली आहे. तर जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूतील जनतेमध्ये चांगली प्रतिमा असलेला सद्यस्थितीत एकही नेता नाही. त्या मुद्द्याचा फायदा उठवत भाजपानं तामिळनाडूमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकण्याची योजना आखली आहे. 2016च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजपाला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर अमित शाह यांनी नवी रणनीती तयार केली आहे. भाजपानं तामिळनाडूमध्ये हातपाय पसरण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तामिळनाडूमध्ये भाजपानं पक्षाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विस्तार कार्यक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत भाजपाचे जवळपास 10 हजार कार्यकर्ते हे पक्षाची सदस्यसंख्या वाढवण्यासाठी कठोर मेहनत घेतायत. तर इतर 5 हजार कार्यकर्ते तामिळनाडूमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी अनेक योजनांवर काम करत आहेत.
तामिळनाडूतील सत्ताधारी पार्टी AIADMK व भाजपा हातमिळवणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रीय राजकारणात देखील तशी चर्चा सुरू झाली आहे. AIADMKच्या माध्यमातून भाजपाला तामिळनाडूमध्ये वर्चस्व निर्माण करायचं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपाचे वरिष्ठ नेता व केंद्रीय मंत्री यासंबंधी AIADMK नेत्यांसोबत बोलणी करतायत. त्यामुळे AIADMK हा एनडीएचा हिस्सा बनल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. पूर्व आणि उत्तरेकडील अनेक राज्यांत भाजपानं सत्ता हस्तगत केली आहे. मात्र दक्षिण भारतात भाजपा सत्तेपासून अद्यापही दूर आहे. उत्तर व मध्य भारतातील राज्यांमध्ये भाजपाने आपला झेंडा फडकावल्यानंतर आता भाजपानं दक्षिण भारतावर लक्ष्य केंद्रित केलं आहे. अशात तामिळनाडूतील AIADMK हा पक्ष भाजपासाठी सर्वाधिक चांगला व सोयीस्कर पर्याय असल्याचे मानले जात आहे. माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूतील सत्तेत संघर्ष सुरू आहे. त्यांचा पक्ष दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. जयललितांच्या निधनानंतर शशिकला यांच्याकडे सत्तेच्या चाव्या जातील, अशी शक्यता होती. मात्र बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात शशिकला यांची कारागृहात रवानगी झाल्यानंतर ई. पलानीस्वामी यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवण्यात आले. तर दुसरीकडे पन्नीरसेल्वम यांनी आधीच बंड पुकारले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीचा लाभ उठवण्याचा भाजपा प्रयत्न करत आहे. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार या कारणांमुळेच रखडल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये मोदींच्या कॅबिनेटचा विस्तार होण्याची शक्यता असून, या मंत्रिमंडळ विस्तारात AIADMK चाही समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एनडीएची सध्या 30 पैकी 18 राज्यांत सत्ता
राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सध्या 30 पैकी 18 राज्यांत सत्ता आहे. नितीश कुमार यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानं राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं 18 राज्यांवर वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी असलेले 48 पक्ष 30 राज्यांपैकी 18 राज्यांत सत्तेवर आहे. मात्र 24 वर्षांपूर्वी म्हणजेच 1993मध्ये यूपीएची अनेक राज्यांत सत्ता होती. त्यावेळी काँग्रेसची जवळपास 15 राज्यांत सत्ता होती. तर एका राज्यांत काँग्रेस सहयोगी पक्षासोबत सत्तेत होती.
कमल हसन आणि रजनीकांत करणार राजकारणात प्रवेश
तामिळनाडूच्या राजकारणात कमल हसन आणि सुपरस्टार रजनीकांतही प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हा लवकरच राजकारणात प्रवेशाची घोषणा करू शकतो, अशी माहिती त्यांचे बंधू सत्यनारायणराव गायकवाड यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दिली होती. रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करावा अशी तामिळनाडूतील जनतेची इच्छा आहे. चाहते आणि हितचिंतकांशी चर्चेची पहिली फेरी त्यांनी पूर्ण केल्याचंही समजतंय. तामिळनाडूचे नेतृत्व करण्यासाठी तमीळ व्यक्तीच का हवी? असा प्रश्न उपस्थित करीत अभिनेता कमल हसन याने अप्रत्यक्षपणे सुपरस्टार रजनीकांत याचे समर्थन केले होते. तामिळनाडूचे नेतृत्व तमीळ व्यक्तीनेच करावे का? असा प्रश्न कमल हसन यांना विचारला असता त्यांनी हे उत्तर दिले होते.