भाजपाच्या विजयानंतर यूपीत मुस्लिमांना गाव सोडण्याची धमकी
By admin | Published: March 16, 2017 04:23 PM2017-03-16T16:23:33+5:302017-03-16T16:23:33+5:30
उत्तर प्रदेशमध्ये बरेली जिल्ह्यात एका गावात मुस्लिमांविरोधात पोस्टर लावण्यात आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
ऑनलाइन लोकमत
बरेली, दि. 16 - उत्तर प्रदेशमध्ये बरेली जिल्ह्यात एका गावात मुस्लिमांविरोधात पोस्टर लावण्यात आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या पोस्टरमध्ये लिहिलं आहे की, उत्तर प्रदेशमध्ये आता भाजपाचं सरकार आलं आहे. आता गावातील हिंदू तेच करतील जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतःच्या देशात मुस्लिमांसोबत करतात.
बरेलीपासून 70 किलोमीटर दूरवर जियानागला गावात मुस्लिमांविरोधात हे पोस्टर लावण्याचे प्रकार राज्यात भाजपानं प्रचंड विजय मिळवल्यानंतर समोर आले आहेत. गावातल्या जवळपास अनेक ठिकाणी हे पोस्टर चिकटवण्यात आले आहेत. ट्रम्प जे काम अमेरिकेत करत आहेत, तेच काम आम्ही इथे करणार आहोत. कारण इथे आता भाजपा सत्तेत आहे, असं या पोस्टरमध्ये छापण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या पोस्टरमध्ये स्थानिक खासदाराचंही नाव टाकण्यात आलं आहे. पोस्टरमधून गावातील मुस्लिमांना या वर्षाच्या शेवटीपर्यंत गाव सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलीस आणि प्रशासनानं सर्वाधिक पोस्टर हटवले आहेत. मात्र अद्यापही काही पोस्टर भिंतीवर लावलेले पाहायला मिळत आहेत. सर्व पोस्टरवर एकसारखाच संदेश लिहिण्यात आला आहे. पोस्टरमध्ये असंही लिहिलं आहे की, यंदाच्या वर्षात मुस्लिमांनी गाव न सोडल्यास त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागणार आहे. मात्र गाववाल्यांना हे कोणी केलं आहे हे माहीत नाही. गावातल्या एका ग्रामसेवकानं सांगितलं की, आम्ही रात्री झोपण्यासाठी गेलो होते. सकाळी उठून पाहतो तर हे सर्व पोस्टर भिंतींवर चिकटवण्यात आले होते. गाववाल्यांनी विरोध दर्शवल्यानंतर याची माहिती पोलिसांत देण्यात आली. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तसेच गावातील पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. गावात पोलिसांनाही तैनात करण्यात आलं आहे. 2500 लोकसंख्या असलेल्या गावात 200 मुस्लिम राहतात. विशेष म्हणजे याआधी अशा प्रकारच्या घटना गावात कधीच घडल्या नाही. आम्ही सर्व गावात शांती आणि सलोख्यानं राहतो. हे काम काही समाजकंटकांनी केलं आहे, असंही गावकरी म्हणाले आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिका-यांसहीत पोलीस अधिकारी लागोपाठ गावाचा दौरा करत आहेत. मात्र अजूनही हे कृत्य कोणी केलं आहे हे पोलिसांना समजलं नाही. बरेलीचे एसपी यमुना प्रसाद म्हणाले की, प्रिंटिंग प्रेस आणि फोटोरेस्टमध्ये काम करणा-या तरुणांकडे आम्ही चौकशी करत आहोत. मात्र अद्यापही आम्ही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाही.