CAA पाठोपाठ केंद्र सरकार आणू शकते लोकसंख्या नियंत्रण कायदा : निरंजन ज्योती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 01:39 PM2020-03-02T13:39:01+5:302020-03-02T13:40:50+5:30
काश्मीरमधून कलम 370 हटविण्यात येऊ शकते, नागरिकता संशोधन कायदा लागू करण्यात येऊ शकतो. त्याचप्रमाणे लोकसंख्या नियंत्रण कायदा देखील अंमलात येऊ शकतो, असा विश्वास निरंजन ज्योती यांनी व्यक्त केला.
नवी दिल्ली - देशात लागू करण्यात आलेल्या नागरिकता संशोधन कायद्यानंतर केंद्र सरकार आता लोकसंख्या नियंत्रण कायदा आणू शकते, असा अंदाज केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे निरंजन ज्योती यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेवरून वाटते की, लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्यासाठी मोदी सकारात्मक आहेत. त्यांनी स्वत: या मुद्दाच्या उपयुक्ततेवर आणि गरजेवर चर्चा केली असल्याचे निरंजन ज्योती यांनी नमूद केले आहे. रविवारी वृंदावन येथील चैतन्य विहारमधील स्वामी वामदेव ज्योतिर्मठाच्या निर्वाण महोत्सवात त्या बोलत होत्या. यावेळी भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सच्चिदानंतर हरी साक्षी उपस्थित होते.
2019 पूर्वी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एकांतात चर्चा केली होती. त्यावेळी मोदींना आपण सांगितले होते की, तुम्ही कितीही रस्ते निर्मिती करा, कितीही घरांचे निर्माण करा अथवा वैद्यकीय महाविद्यालये उभारा, जोपर्यंत वेगाने वाढणारी लोकसंख्या नियंत्रणात येणार नाही तोपर्यंत फारसं यश येणार नाही. यावर मोदींनी स्मित हास्य केले होते. या विषयावर मोदींनी विचारमंथन नक्की केले असेल. किंबहुना त्या दृष्टीने मोदींनी वाटचालही केलेली असू शकते, असंही निरंजन ज्योती यांनी म्हटले आहे.
दरम्यान काश्मीरमधून कलम 370 हटविण्यात येऊ शकते, नागरिकता संशोधन कायदा लागू करण्यात येऊ शकतो. त्याचप्रमाणे लोकसंख्या नियंत्रण कायदा देखील अंमलात येऊ शकतो, असा विश्वास निरंजन ज्योती यांनी व्यक्त केला.