पुढची मोहीम.. थेट चंद्रावर संशोधन केंद्र; इस्रोने जपानच्या सहकार्याने आखली ‘लुपेक्स’ मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 01:27 PM2023-08-23T13:27:25+5:302023-08-23T13:31:04+5:30
संशोधनात घेणार आणखी मोठी झेप; जोरदार तयारी सुरू
बंगळुरू: चंद्रयान-३चे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर भारताची इस्रो ही अवकाश संशोधन संस्था जपानच्या सहकार्याने पुढची चंद्रमोहीम हाती घेणार आहे. लुनार पोलार एक्स्प्लोरेशन मिशन (लुपेक्स) असे या मोहिमेचे नाव असून त्यासाठी इस्रो व जपान एरोस्पेस एक्स्प्लोरेशन एजन्सी (जाक्सा) हे संयुक्तरीत्या रोव्हर व लँडर तयार करत आहेत. जपानमधील राष्ट्रीय अंतराळ संशोधन धोरणविषयक कॅबिनेट समितीचे उपाध्यक्ष तसेच राष्ट्रीय खगोलविज्ञान प्रयोगशाळेचे महासंचालक साकू त्सुनेता यांनी या महिन्याच्या प्रारंभी इस्रोच्या मुख्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी लुपेक्स मोहिमेच्या प्रगतीविषयी त्सुनेता व इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्यात चर्चा झाली होती.
अहमदाबाद येथे केंद्रीय अंतराळ संशोधन खात्याच्या अख्यत्यारीतील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पीआरएल) देखील लुपेक्स मोहिमेसाठी काम करत आहे. चंद्रावरील कायम अंधारलेल्या भागात लुपेक्स मोहिमेसाठी कोणती उपकरणे बनविता येतील याचे पीआरएलने जाक्साला प्रस्ताव दिले आहेत.
देशासाठी महत्त्वाची घटना
चंद्रावर संशोधनासाठी भविष्यात एक केंद्र स्थापन करण्याचा विचार असून त्यादृष्टीने लुपेक्स मोहिमेची आखणी करण्यात आली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर गोठलेले बर्फ, पाणी आढळल्यास त्याचे किती प्रमाण आहे, चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हर, लँडरसारख्या गोष्टींच्या वाहतुकीसाठी अधिक प्रगत तंत्रज्ञान विकसित करणे अशा अनेक गोष्टींबद्दल अभ्यास करण्यात येणार आहे. चंद्रयान-३चे लँडिंग घटना भारतातील विज्ञान, इंजिनीअरिंग संशोधन संस्था, उद्योग यांच्यासह साऱ्या देशासाठी महत्त्वाची घटना आहे. (वृत्तसंस्था)
किचकट आणि अवघड कामाचे नेतृत्त्व; चंद्रयानच्या सॉफ्ट लँडिंगची जबाबदारी नेमकी कुणावर?
चंद्रयान-३ चंद्रावर यशस्वी लँडिंग करण्यासाठीची जबाबदारी मोहीम संचालक मोटमरी श्रीकांत यांच्यावर आहे. चंद्रयान-२ च्या दरम्यान ते मिशन डायरेक्टर रितू करिधाल श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते. श्रीकांत यांच्यासोबत कोअर टीममध्ये प्रकल्प संचालक पी. वीरामुत्तुवेलू आणि सहयोगी संचालक कल्पना कालहस्ती यांचा समावेश आहे. मोहीम सुरू झाल्यानंतर सर्व काही मिशन संचालकांच्या हातात असते. पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षेतील प्रत्येक डावपेच ते चंद्रावर उतरण्यापर्यंतची सर्व गणिते आणि योजना मिशन डायरेक्टर ठरवतात.
मोहिमेचे नेतृत्व कोण करतेय?
- एस सोमनाथ : इस्रो अध्यक्ष
- एस. उन्नीकृष्णन नायर : विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक
- बीएन रामकृष्ण : इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क (इसट्रॅक)
- व्ही. नारायणन : लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम (एलपीएससी) संचालक
- एम. शंकरन : प्रोफेसर यूआर राव उपग्रह केंद्राचे संचालक
- नीलेश देसाई : इस्रो उपग्रह अनुप्रयोग केंद्र (एसएसी)
चंद्रयान-३ च्या लँडिंगच्या क्षणाची मीही आतुरतेने प्रतीक्षा करत आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास त्यामुळे चंद्राच्या संशोधनासाठी खूप मोलाची मदत होणार आहे. अन्य ग्रहांवर असलेल्या स्थितीचा शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. त्यासाठी चंद्रयान-३ टिपत असलेली चंद्राची छायाचित्रे खूप महत्त्वाचे साधन आहे.
-सुनीता विल्यम्स, अंतराळवीर, नासा
रोव्हर चंद्रावर नेणार नासा, ईएसएचीही उपकरणे
लुपेक्स मोहिमेतील रोव्हर केवळ इस्रो व जाक्साचीच नव्हे तर अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासा व युरोपियन स्पेस एजन्सी (ईएसए) यांचीही उपकरणे घेऊन चंद्रावर जाणार आहे. त्यामुळे ही एक प्रकारे जागतिक स्तरावरील चंद्रमोहीम असून त्यात भारताचा असलेला सहभाग हा अभिमानाचा विषय असणार आहे.
सोशल मीडियावरही चंद्रयानाची झेप
चंद्रयान-३ च्या घडामोडींची माहिती इस्रो अनौपचारिक पद्धतीने सोशल मीडियावर देत आहे. वेलकम बडी, थँक्स फॉर जी राईड मेट अशा पोस्टमधून चंद्रयान-३च्या हालचालींबद्दल माहिती देणाऱ्या इस्रोने जगभरातील करोडो लोकांची मने जिंकली आहेत. इस्रो किचकट शास्त्रीय भाषेऐवजी लोकांच्या तोंडी रुळलेल्या साध्यासोप्या शब्दांचा वापर करून देत असलेली माहिती सर्वांना आवडत आहे. चंद्रयान-२च्या ऑर्बिटरचा चंद्रयान-३शी संपर्क झाला त्या घटनेचे वर्णन इस्रोने ‘वेलकम, बडी’ असे केले होते.
नेमका फायदा काय?
मेलबर्न : चंद्रयान-३ चंद्रावर उतरल्यामुळे आर्थिक फायदे मिळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. चंद्रयान-३ च्या लँडिंगनंतर, चंद्रावर रोव्हर तैनात करण्याची आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे. ही मोहीम केवळ राष्ट्रीय अभिमानाची बाब नव्हे तर भारताच्या अंतराळ अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम करणारी मोहीम आहे.
फायदे काय?
- आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुनर्वापर
- स्टारलिंकने जगभरात इंटरनेटचा प्रसार
- सौर ऊर्जा निर्मिती वाढवणे
- आरोग्य तंत्रज्ञान
५४६ अब्ज डॉलरच्या मूल्यावर जागतिक अंतराळ अर्थव्यवस्था २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत पोहोचली आहे.
- ९१%ची मोठी वाढ अंतराळ अर्थव्यवस्थेत गेल्या दशकभरात झाली.
- १३ अब्ज डॉलरपर्यंत भारताची अंतराळ अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
चंद्राची छायाचित्रे टिपली स्वदेशी कॅमेऱ्याने
चंद्राच्या पृष्ठभागापासून ७० किमी उंचीवरून चंद्रयान-३मधील लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेऱ्याने (एलपीडीसी) १९ ऑगस्ट रोजी टिपलेली छायाचित्रे इस्रोने मंगळवारी जारी केली आहेत. या छायाचित्रांमुळे चंद्राच्या पृष्ठभागाची नेमकी माहिती मिळून त्या ठिकाणी विक्रम लँडरला उतरणे सुलभ होणार आहे. हा कॅमेरा अहमदाबाद येथील इस्रोच्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटरने बनविला आहे.
‘विद्यार्थ्यांना चंद्रयान लँडिंग लाइव्ह दाखवा’
चंद्रयान-३ उद्या, बुधवारी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार असून त्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग केले जाणार आहे. ते पाहण्यासाठी महाविद्यालये, विद्यापीठांनी विद्यार्थी व शिक्षकांना प्रोत्साहन दिले पाहिजे, अशी सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने केली आहे. यूजीसीचे सचिव मनीष जोशी यांनी यासंदर्भात सोमवारी शिक्षणसंस्थांना सांगितले की, चंद्रयान-३ बुधवारी संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करणार आहे. त्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग पाहण्याची व्यवस्था शिक्षणसंस्थांनी करावी.