४० वर्षे केली शहराची स्वच्छता, सफाई कर्मचारी चिंता देवी बनल्या उपमहापौर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 10:56 AM2023-01-01T10:56:01+5:302023-01-01T10:56:50+5:30
चिंता देवी या महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या.
बिहारच्या गया जिल्ह्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. येथील महापालिकेच्या निवडणुकीत महापौर पदासाठी रविंद्र कुमार यांचा विजय झाला आहे, तर उपमहापौरपदावर चिंता देवी यांनी निवडणूक जिंकली आहे. नवनिर्वाचित उपमहापौर चिंता देवी गेल्या ४० वर्षांपासून महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होत्या. मात्र, महापालिका निवडणुकी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या निवडणुकीत त्यांनी तब्बल १६००० मतांनी विजय मिळवला आहे.
चिंता देवी या महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे, दररोज कचरा उचलणे, झाडू मारणे हे त्यांचं नित्याचंच काम बनलं होतं. मात्र, यावेळी गया महापालिकेच्या उपमहापौर पदासाठी निवडणुकांमध्ये जागा आरक्षित ठेवण्यात आली. त्यामुळे, चिंता देवी यांना निवडणुकीत उभारण्याची संधी मिळाली, आपला स्वभाव आणि लोकांच्या पाठिंब्यामुळे पहिल्याच निवडणुकीत त्या भरगोस मतांनी विजयी झाल्या. एक सफाई कामगार महिला थेट महापालिकेच्या उपमहापौरपदी विराजमान झाल्या.
आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्याचं काम ज्यांनी गेल्या ४० वर्षांपासून केलं, आता त्याच शहराची सर्वांगिण स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी लोकांनी त्यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे, एक सफाई कर्मचारीही उपमहापौरपदी पोहोचू शकतो, हेच त्यांनी दाखवून दिले. दरम्यान, चिंता देवी ह्या २०२० पर्यंत महापालिकेत झाडू मारायचं काम करत होत्या, सेवानिवृत्तीनंतर त्यांनी भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र, आता शहराच्या उपमहापौरपदाची खुर्ची त्या सांभाळतील, चिंता देवी यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे.
गया येथे २८ डिसेंबर रोजी ७७ वार्डातील नगरसेवकांच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडून घेण्यात आली. त्यामध्ये, विंरेंद्र पासवान हे महापौर बनले तर उपमहापौरपदी चिंता देवी यांनी विजय मिळवला.