वणवे नियंत्रणात आल्यानंतर अखेर वैष्णोदेवी यात्रा पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 01:29 AM2018-05-25T01:29:51+5:302018-05-25T01:29:51+5:30
तीन राज्यांच्या जंगलात आग : विझवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर
ऋषिकेश : उत्तराखंडातील जंगलांमध्ये गेल्या सात दिवसांपासून पसरलेल्या वणव्यामुळे वैष्णोदेवीची बुधवारी थांबवण्यात आलेली यात्रा गुरुवारी सकाळी सुरू झाली. संझीछाट ते वैष्णोदेवी हेलिकॉप्टर सेवा तसेच कटऱ्याहून बाणगंगामार्गे चालत जाण्याचा मार्ग आज सकाळी सुरू करण्यात आला. त्यामुळे १0 हजार भाविक वैष्णोदेवीच्या दिशेने निघाले आहेत.
मात्र आसपासच्या जंगलातील वणव्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडातील जंगलात पेटलेला वणवा आता हिमाचल प्रदेश व जम्मू-काश्मीरच्या जंगलात पोहोचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा थांबवण्यात आल्याचे सांगण्यात आले. या काळात रोज हजारो भाविक कटरापासून वर डोंगरापर्यंत वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी चालत जात असतात. भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सची आग विझवण्यासाठी मदत घेतली जात आहे. याशिवाय अग्निशामक दलाचे जवान, सीआरपीएफचे जवान व एनडीआरएफचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. उत्तराखंडातील जंगलांतील आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आतापर्यंतचे प्रयत्न यशस्वी झालेले नाहीत. त्या भागात गुरुवारी जोरदार पाऊस झाला. मात्र त्यामुळे
आग पूर्णत: विझलेली नाही.
आग विझवण्यासाठी अत्याधुनिक साधनांचा वापर केला जात
आहे. (वृत्तसंस्था)
करोडोंचे नुकसान
आगीबरोबरच कटरा व एकूणच जम्मूमध्ये कडक उन्हाळ्याचा त्रासही भाविकांना व रहिवाशांना आहे. दरवर्षी उत्तराखंडातील जंगलांमध्ये आगी लागतातच, पण यंदाचा वणवा भयावह असून, त्यात करोडो रुपयांची नैसर्गिक संपत्तीही जळून खाक झाली आहे. जनावरांना आगीचा तडाखा सहन करावा लागत आहे. या आगीत अनेक जनावरे होरपळून निघाली आहेत.
एसडीआरएफची
टीम आग आटोक्यात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. हिमाचल प्रदेशच्या सिमलाच्या आसपासच्या परिसरातही आग पसरली आहे.