"प्लीझ हे थांबवा", अधिकाऱ्यांना फोन करून 'त्याने' स्वत:च लग्न मोडलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 03:33 PM2021-11-29T15:33:48+5:302021-11-29T15:40:44+5:30
एखाद्या मुलाने फोन करून लग्न मोडण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे.
नवी दिल्ली - देशात अद्यापही अनेक ठिकाणी बालविवाह होत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. अनेकदा मुलींची इच्छा नसताना त्यांचं वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीशी लग्न लावलं जातं. अशावेळी मुली विरोध करतात. तर कधी हेल्पलाईनच्या माध्यमातून मदत मागतात. पण यावेळी चक्क एका मुलाने अधिकाऱ्यांना फोन करून स्वत:चा बालविवाह थांबवल्याचं समोर आलं आहे. "मला लग्न नाही करायचंय, मला शिकायचंय" असं म्हणत मुलाने आपलं लग्न थांबवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. राजस्थानच्या दौसामध्ये ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलींचा बालविवाह होत असेल तर अनेकदा तिचे लग्न रोखण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. मात्र आता एका 19 वर्षीय मुलाने फोन करून त्याचा बालविवाह करण्यात येत असल्याची माहिती दिली. राज्य बाल आयोगाला फोन करून याबाबत माहिती दिली आणि लग्न थांबवलं आहे. "मला शिकायचं आहे. माझं सध्या लग्नाचं वय नाही. म्हणूनच माझं आता होत असलेलं लग्न तातडीने थांबवा" असं मुलाने फोनवर म्हटलं आहे. त्यानंतर या प्रकरणाची दखल घेऊन मुलाच्या घरी सध्या पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
30 नोव्हेंबर रोजी होतं लग्न
दौसामधील एका 19 वर्षीय मलाचं 30 नोव्हेंबर रोजी लग्न होतं. त्याआधीच त्याने राज्य बाल आयोगाला फोन करून आपल्या मनाविरुद्ध होत असलेल्या लग्नाची माहिती दिली. बाल हक्क अध्यक्षा संगीता बेनीवाल यांनी यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कलेक्टर पीयूष समारिया हे मुलाच्या घरी पोहोचले. त्यावेळी घरामध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळालं. मुलाच्या घरामध्ये काही कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी मुलगा 19 वर्षांचा असल्याचं समोर आलं आहे. तसेच तो सध्या परीक्षेची तयारी करत आहे.
मुलाने फोन करून लग्न मोडण्याची ही कदाचित पहिलीच वेळ
संगीता बेनीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुली बालविवाह रोखण्यासाठी फोन करतात. पण एखाद्या मुलाने फोन करून लग्न मोडण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. बेनिवाल यांच्या म्हणण्यानुसार, मुलाने फोन करून लग्न असल्याचे सांगितले होते. लग्नपत्रिकेच्या फोटोसोबत त्यांनी वयाचा पुरावा म्हणून दहावीच्या गुणपत्रिकेचा फोटोही पाठवला होता. यानंतर बेनिवाल यांनी अधिकाऱ्यांना बोलावून लग्न थांबवण्याच्या सूचना दिल्या. सध्या अधिक तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.