Asaduddin Owaisi Security: 'मृत्यूनंतर मला औरंगाबादमध्ये दफन केलं जावं', ओवेसींच्या विधानावरुन नवा वाद; शिवसेनेचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 02:43 PM2022-02-05T14:43:32+5:302022-02-05T14:44:06+5:30
Asaduddin Owaisi Security: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर गोळीबार झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद लोकसभेत उमटले.
Asaduddin Owaisi Security: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर गोळीबार झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद लोकसभेत उमटले. ओवेसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत या घटनेनंतर सरकारनं देऊ केलेली झेड दर्जाची सुरक्षा देखील नाकारली आहे. लोकसभेत केंद्र सरकारवर निशाणा साधताना ओवेसी यांनी केलेलं एक विधान सध्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. 'मी मृत्यूला घाबरत नाही. कधी ना कधी आपल्यातील प्रत्येकाला जायचंच आहे. पण माझा मृत्यू झाला तर अल्लाहच्या कृपेनं माझा दफनविधी औरंगाबादच्या जमिनीत व्हावा', असं विधान असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेतील भाषणात केलं होतं. ओवेसींच्या याच विधानानं राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
ओवेसींच्या विधानावर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी सडकून टीका केली आहे. "ओवेसींवर हल्ला झाला ही गोष्ट दुर्देवी आहे. पण त्यांनी औरंगाबादमध्ये दफन विधीची इच्छा व्यक्त करुन त्यांचे खरे दात दाखवले आहेत. औरंगाबादमध्ये औरंगजेबाची कबर आहे. त्यामुळेच त्यांनी दफनविधीसाठी औरंगाबादची इच्छा व्यक्त केली आहे", असं अंबादास दानवे म्हणाले.
नेमकं काय म्हणाले ओवेसी?
असदुद्दीन ओवेसी यांच्यावर कारवर गोळीबार घडल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. ओवेसींसोबत घडलेल्या या जीवघेण्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं ओवेसी यांना झेड दर्जाची सुरक्षा देऊ केली. पण ओवेसींनी ती नाकारली. लोकसभेत भाषणावेळी ओवेसींनी त्यांचं मत व्यक्त केलं आणि सरकारवर घणाघाती टीका केली.
"भ्याड हल्ल्यांना घाबरुन मी घरात बसणाऱ्यांपैकी नाही. देशातील नागरिकांना सुरक्षित वातावरण देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. एका खासदाराच्या जीवाची किंमत गरीब माणसापेक्षा अधिक असू शकत नाही. केंद्र सरकार नेमकं कोणत्या गोष्टीसाठी मला सुरक्षा देऊ इच्छित आहे?", असा प्रतिसवाल ओवेसी यांनी लोकसभेत उपस्थित केला.
"ज्या लोकांनी माझ्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला त्यांचा गोळीवर विश्वास आहे. मतदानावर नाही. असे लोक ना संविधानावर विश्वास ठेवत ना न्यायपालिकेवर. अशा लोकांना भाजपा काय रोखणार?, मी मृत्यूला घाबरत नाही. प्रत्येकाला कधी ना कधी जायचंच आहे. पण माझ्या मृत्यूनंतर माझी अल्लाहकडे इच्छा आहे की माझा दफनविधी औरंगाबादमध्ये व्हावा", असं ओवेसी लोकसभेतील भाषणात म्हणाले होते.