रुग्णालयात उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू; संतप्त कुटुंबीयांनी डॉक्टरला केली बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 02:17 PM2023-09-19T14:17:55+5:302023-09-19T14:18:53+5:30
एका व्यक्तीने एनएसीयू वॉर्डमध्ये तैनात असलेल्या डॉक्टर कमलेश यांना अचानक मारहाण करण्यास सुरुवात केल्याने खळबळ उडाली.
झारखंडमधील जमशेदपूरमध्ये सोमवारी रात्री एका मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी रुग्णालयातील डॉक्टरला बेदम मारहाण केली. प्रत्यक्षात रात्री एकच्या सुमारास कोल्हानच्या सर्वात मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात एका व्यक्तीने एनएसीयू वॉर्डमध्ये तैनात असलेल्या डॉक्टर कमलेश यांना अचानक मारहाण करण्यास सुरुवात केल्याने खळबळ उडाली.
कोणाला काही समजण्यापूर्वीच त्या व्यक्तीने डॉक्टरला बेदम मारहाण केली. यानंतर रुग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला. सगळे इकडे तिकडे धावू लागले. यावेळी उपस्थित लोकांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले. या हल्ल्यात डॉ.कमलेश गंभीर जखमी झाले आहेत.
सीतारामडेरा पोलीस स्टेशन परिसरातील देव नगर येथील रहिवासी दीपक प्रधान यांनी सोमवारी त्यांची सहा वर्षांची मुलगी अनु प्रधान हिला रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या कारणावरून घरातील सदस्य संतप्त झाले होते. डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप कुटुंबीय करत होते.
मंगळवारी रुग्णालयात डॉक्टरांसोबत झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे एमजीएम रुग्णालयातील सर्व डॉक्टरांनी आपलं काम बंद केलं आहे. डॉक्टरांनी आपत्कालीन सेवा वगळता सर्व प्रकारच्या उपचारांपासून स्वतःला दूर ठेवले आहे. सर्वजण अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत संपावर बसले आहेत. डॉक्टर सुरक्षितता आणि न्यायासाठी याचना करत आहेत.
या घटनेबाबत पीडित डॉ.कमलेश यांनी सांगितले की, आम्ही मुलीला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, आम्ही सतत मुलीच्या प्रकृतीची माहिती कुटुंबीयांना देत होतो. अखेर उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला, त्यानंतर रात्री कुटुंबीयांनी आम्हाला मारहाण केली. या प्रकरणाबाबत इतर डॉक्टरांनी सांगितले की, अशा घटना खपवून घेता येणार नाहीत, आम्हाला सुरक्षा हवी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.