Corona Kappa Variant: कोरोनाच्या डेल्टा प्लसनंतर भारतात आता ‘कप्पा’ व्हेरिएंटचा धोका; ‘या’राज्यात २ रुग्ण आढळले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 04:34 PM2021-07-09T16:34:08+5:302021-07-09T16:35:17+5:30
कप्पा व्हेरिएंटच्या भारतातील प्रवेशाने आणखी एक संकट उभं राहिलं आहे. डेल्टा व्हायरसचं बदलेलं रुप डेल्टा प्लस व्हेरिएंट धोकादायक आहे.
उत्तर प्रदेशात कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट समोर आला आहे. डेल्टा व्हेरिएंट(Delta Variant) नंतर आता राज्यात कप्पा व्हेरिएंट(Corona Kappa Variant) चे रुग्ण आढळून आल्याने खळबळ माजली आहे. कप्पा व्हेरिएंटच्या पुष्टीमुळे राज्यातील आरोग्य विभागाची डोकेदुखी आणखी वाढली आहे. लखनौच्या केजीएमयू हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेल्या १०९ नमुन्यांपैकी १०७ नमुन्यात डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळला तर २ रुग्णांमध्ये कप्पा व्हेरिएंट आढळला आहे.
यापूर्वी गुरुवारी गोरखपूर आणि देवरिया येथे दोन रुग्णांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटची पुष्टी झाली होती. यूपीच्या पूर्वेकडे नव्या व्हेरिएंटच्या प्रवेशाने लोकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्याची प्रकृती सध्या ठीक आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटने एकाचा मृत्यू झालाय तो देवरिया येथे राहणारा होता. त्यांचे वय ६६ वर्ष होते. माहितीनुसार १७ मे रोजी ते कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर परिस्थिती गंभीर झाल्यानंतर त्यांना बीआरडी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. जूनमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. रुग्णाच्या मृत्यूनंतर त्यांचे सँपल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. आता कप्पा व्हेरिएंट आढळल्याने डोकेदुखी वाढली आहे. कारण कप्पा व्हेरिएंटने यूके आणि यूएसमध्ये कहर माजवला आहे.
३ जिल्ह्यांमध्ये एकही एक्टिव रुग्ण नाही
गुरुवारी उत्तर प्रदेशात २४ तासांत २ लाख ५९ हजार १७४ लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात ११२ लोकांना कोरोनाची लागण असल्याचं समोर आलं. उत्तर प्रदेशातील श्रावस्ती, अलीगड, कासंगज याठिकाणी एकही सक्रीय रुग्ण नाही.
डेल्टाप्रमाणे कप्पा व्हेरिएंटही धोकादायक
कप्पा व्हेरिएंटच्या भारतातील प्रवेशाने आणखी एक संकट उभं राहिलं आहे. डेल्टा व्हायरसचं बदलेलं रुप डेल्टा प्लस व्हेरिएंट धोकादायक आहे. डेल्टा प्लसला भारतात व्हेरिएंट ऑफ कंर्सन घोषित केले आहे. तर कप्पा व्हेरिएंटला जागतिक आरोग्य संघटनेने व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट घोषित केले आहे. ज्या रुग्णांमध्ये कप्पा व्हेरिएंट आढळला आहे त्या रुग्णांची तातडीने ट्रव्हल हिस्ट्री आणि कुटुंबातील सदस्यांना ट्रेस केले जात आहे. कप्पा व्हेरिएंट B.1617 चं म्यूटेशन आहे. बी १६१७ अनेक म्यूटेशन झाले आहेत. ज्यातील २ ई ४८४ क्यू आणि एल ४५२ आर विशेष आहे. या व्हायरसचं डबल म्यूटेंट म्हटलं जातं. डेल्टा व्हेरिएंटप्रमाणे कप्पा व्हेरिएंटही धोकादायक आहे.