दिवाळीनंतर मुंबई-दिल्ली दरम्यान तिसरी ‘राजधानी’, प्रवासाचा वेळ दोन तासांनी कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 04:53 AM2017-09-19T04:53:10+5:302017-09-19T04:53:14+5:30
मुंबई आणि दिल्ली दरम्यान दिवाळीनंतर तिसरी ‘राजधानी एक्स्प्रेस’ सुरु करण्याची तयारी रेल्वे प्रशासानने सुरु केली असून ही नवी गाडी अधिक वेगाने धावून १३ तासांत दिल्लीला पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.
नवी दिल्ली : मुंबई आणि दिल्ली दरम्यान दिवाळीनंतर तिसरी ‘राजधानी एक्स्प्रेस’ सुरु करण्याची तयारी रेल्वे प्रशासानने सुरु केली असून ही नवी गाडी अधिक वेगाने धावून १३ तासांत दिल्लीला पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. सध्या या दोन शहरांच्या दरम्यान ‘आॅगस्ट क्रांती राजधानी’ आणि ‘मुंबई-दिल्ली राजधानी’ अशा दोन राजधानी एक्स्प्रेस चालविल्या जातात. ‘आॅगस्ट क्रांती’ ताशी सरासरी ८० किमी वेगाने धावून १७ तास पाच मिनिटांनी निजामुद्दीन येथे पोहोचते.
तर ‘राजधानी’ यापेक्षा थोडी जलद म्हणजे ताशी सरासरी ८९ किमी वेगाने धावून १५ तास ३५ मिनिटांत नवी दिल्लीला पोहोचते. मुंबई सेंट्रलहून निजामुद्दीत १,३७७ तर नवी दिल्ली १,३ ८६ किमीवर आहे. एका वरिष्ठ रेल्वे अधिका-याने सांगितले की, तिसरी ‘राजधानी एक्स्प्रेस’ वांद्रे टर्मिनस येथून सुटून १३ तासांत निजामुद्दीन येथे पोहोचेल, अशी तयारी केली जात आहे.
‘राजधानी एक्स्प्रेस’चा मंजूर वेग ताशी १३० किमीचा आहे. परंतु वाटेतील अनेक वळणे व अेनक ठिकाणी असलेली वेगमर्यादेची
बंधने यामुळे प्रत्यक्ष सरकारी वेग ताशी ८९ किमीपर्यंत जाऊ शकतो. नवी ‘राजधानी’ चालविताना हा कमाल ताशी सरासरी वेग ९० ते ९५ किमीपर्यंत वाढविला जाईल. या अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार ‘नव्या राजधानी’साठी चाचण्या येत्या दोन-तीन दिवसांत सुरु होतील व प्रत्यक्ष नवी गाडी बहुधा दिवाळीनंतर सुरु केली जाऊ शकेल.
>अनेक पर्यायांवर विचार
नव्या गाडीचा प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी अनेक पर्यायांची चाचणी घेण्यात येईल. सध्याच्या राजधानीप्रमाणे गाडीला २४ डबे व दोन इंजिने लावायची पण नेहमीच्या डब्यांऐवजी अत्याधुनिक ‘एलएचबी’ डबे वापरायचे. २४ ऐवजी १४ ‘एलएचबी’ डब्यांची गाडी एका इंजिनाने चालवायची. सध्याची मुंबई-दिल्ली राजधानी वाटेत सहा ठिकाणी थांबते.त्याएवजी नवी गाडी दोन किंवा तीनच ठिकामी थांबवायची.