प्रत्येक वापरानंतर रेल्वेतील ब्लँकेट धुतले जाणार
By admin | Published: March 13, 2016 10:47 PM2016-03-13T22:47:00+5:302016-03-13T22:47:00+5:30
रेल्वेतील घाणेरडा वास येणारी ब्लँकेटस् आता भूतकाळातील बाब ठरणार आहे. एकदा वापरल्यानंतर ब्लँकेट धुण्याचा नवा दंडक रेल्वे प्रथमच घालून देणार आहे.
नवी दिल्ली : रेल्वेतील घाणेरडा वास येणारी ब्लँकेटस् आता भूतकाळातील बाब ठरणार आहे. एकदा वापरल्यानंतर ब्लँकेट धुण्याचा नवा दंडक रेल्वे प्रथमच घालून देणार आहे.
जुनी जाड ब्लँकेट जाऊन आता हलकी नव्या डिझाईनची मऊ ब्लँकेट वातानुकूलित डब्यातील प्रवाशांना पुरविली जाणार आहे. सध्या ब्लँकेट महिन्यातून दोनदा किंवा कधी एकदाच धुतली जातात. राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेने (एनआयएफटीने) डिझाईन केलेली नवी ब्लँकेटस् प्रत्येक वापरानंतर धुतली जाणार असून ती बराच काळ टिकू शकतात, असे रेल्वे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
एनआयएफटीने धाग्यांचे ब्लँकेट हे वूल (उनी कापड) आणि कापसापासून तयार केले असून ते दररोज धुता येते.
ब्लँकेटच्या वास येण्याच्या तक्रारीवर तोडगा काढण्यात येत असून रेल्वेने या ब्लँकेटच्या वापराला मंजुरी दिली आहे. अशा ब्लँकेटचा काही निवडक रेल्वेमध्ये प्रथम वापर केल्यानंतर व्याप्ती वाढविली जाईल.
ब्लँकेट आणि बेडरोल धुण्यासाठी लाँड्रीची वाढती गरज लक्षात घेता अनेक रेल्वेस्थानकांवर ती सोय केली जाईल. केवळ ब्लँकेट नव्हे, तर संपूर्ण बेडरोल रंगसंगतीसह सादर करण्याची योजना एनआयएफटीने आखली आहे. त्यामुळे बेडशीट आणि उशांना (पिलो कव्हर) नवे रंगरूप लाभेल.
(लोकमत न्यूज नेटवर्क)रेल्वेने अलीकडेच ई- बेडरोल सुविधा सुरू केली आहे. आॅनलाईन तिकीट बुक करताना प्रवाशांना बेडरोलचा पर्याय उपलब्ध असेल.
स्लीपर कोचमधील प्रवाशांनाही रेल्वेस्थानकावर बेडरोल किट दरानुसार वापरता येईल किंवा तिकीट खरेदी करतानाही ती सोय राहील. सध्या वातानुकूलित डब्यांमधून प्रवास करणाऱ्यांसाठीच मोफत बेडरोलची सुविधा आहे.