व्यापाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; जमीन घोटाळ्यात ईडीने बजावले होते समन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 04:28 PM2024-05-09T16:28:37+5:302024-05-09T16:30:43+5:30
झारखंडमध्ये ईडीची नोटीस मिळाल्यानंतर एका व्यापाऱ्याने टोकाचं पाऊल उचल्याचे समोर आलं आहे.
ED Action : गेल्या काही वर्षांपासून देशभरात अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ईडीच्या कारवाईमुळे अनेकांना तुरुंगवास देखील भोगावा लागत आहे. मात्र सत्ताधाऱ्यांकडून घाबरवण्यासाठी ईडीच्या माध्यमातून कारवाई केली जातेय असा आरोप विरोधकांकडून होतोय. दुसरीकडे सरकार आणि ईडी कारवाईचा काहीही संबंध नसल्याचा दावा सत्ताधारी पक्ष केला जातोय. अशातच झारखंडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. झारखंडमध्ये ईडीची नोटीस आल्यानंतर एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे.
झारखंडमध्ये सध्या ईडीच्या सुरु असलेल्या बेधडक कारवायांना एका व्यापाऱ्याच्या आत्महत्येसोबत जोडलं जात आहे. रांचीमध्ये एका जमीन व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून नोटीस मिळाल्यानंतर व्यापारी तणावाखाली होता असे म्हटलं जात आहे. गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
रांचीच्या लालपूर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. कृष्णकांत नावाच्या जमीन व्यापाऱ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.गळफास घेतल्याचे कळल्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ कृष्णकांत यांना ऑर्किड रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.
मृत कृष्णकांत यांच्या जवळच्या लोकांनी सांगितले की, रांची जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वी त्यांना नोटीस पाठवली होती. ईडीने त्यांना या प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते. नोटीस मिळाल्यानंतर कृष्णकांत तणावाखाली होते. मात्र, आत्महत्येमागे ईडीची नोटीसच कारणीभूत आहे की नाही, हे समोर आलेलं नाही. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
जून २०२२ मध्ये, रांचीमधील बरैतू पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर नोंदवण्यात आला होता. यामध्ये प्रदीप बागची नावाच्या व्यक्तीला मुख्य आरोपी करण्यात आले होते. बनावट कागदपत्रांच्या मदतीने भारतीय लष्कराची मालमत्ता हडप केल्याचा आरोप प्रदीपवर होता. ईडीने या प्रकरणाची चौकशी केली असता, ही ४.५ एकर जमीन बीएम लक्ष्मण राव यांची असल्याचे समोर आले, ज्यांनी ती स्वातंत्र्यानंतर लष्कराच्या ताब्यात दिली होती. याच जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात कृष्णप्रकाश यांना ईडीने नोटीस बजावली होती.