आठ मुलींनंतर 82 व्या वर्षी पीठाधिपतींना झाला मुलगा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2017 12:19 PM2017-11-02T12:19:34+5:302017-11-02T12:23:48+5:30
उत्तर कर्नाटकातील एका मठाच्या पीठाधिपतींना वयाच्या 82 व्या वर्षी मुलगा झाला आहे.
कलबुर्गी- उत्तर कर्नाटकातील एका मठाच्या पीठाधिपतींना वयाच्या 82 व्या वर्षी मुलगा झाला आहे. आठ मुलींनंतरच्या मुलाचा बुधवारी मुंबईतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये जन्म झाला. पीठाधिपतींचं हे नववं अपत्य आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
शरणबसप्पा अप्पा हे कलबुर्गीतील शरण बसवेश्वर संस्थान या मठाचे पीठाधिपती आहे. शरणबसप्पा यांच्या दुसऱ्या बायकोने बुधवारी मुंबईतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये बाळाला जन्म दिला. शरणबसप्पा आणि त्यांच्या पहिल्या बायकोला पाच मुली आहेत तर दुसऱ्या बायकोला तीन मुली असून आता चौथा मुलगा आहे.
शरणबसप्पा यांचा मुलगा शहरात सध्या चर्चेचा विषय आहे. या नवजात बाळाला पाहण्यासाठी शहरातील लोकांनी मठात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पण मठातील अधिकाऱ्यांनी काही कारण देत लोकांना तेथून परत पाठवलं. शरणबसप्पा अप्पा यांचा पुतण्या लिंगराजप्पा अप्पा यांनी मुलाच्या जन्माने आम्ही सगळे आनंदी असल्याचं सांगितलं. तसंच मुंबईतील हॉस्पिटलमध्ये बाळाचा जन्म झाल्याचंही त्यांनी म्हंटलं.
शरणबसप्पा त्यांच्यानंतर मठाची सूत्र सांभाळण्यासाठी मुलाच्या प्रतिक्षेत होते. मठाची एकुण 100 कोटींची संपत्ती असून त्यासाठी त्यांना वारसदार हवा होता, अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे. कलबुर्गीतील शरण बसवेश्वर मंदिराच्या मालकीचा हा मठ आहे.