कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८: 'बुआ'-'बबुआ'ची कर्नाटकात मैत्री नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 10:34 AM2018-04-30T10:34:49+5:302018-04-30T10:35:45+5:30

गोरखपूर, फुलपूरमधील पोटनिवडणुकीत अखिलेश, मायावती एकत्र आले होते

After UP Experiment SP And BSP Not Friends In Karnataka | कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८: 'बुआ'-'बबुआ'ची कर्नाटकात मैत्री नाही

कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८: 'बुआ'-'बबुआ'ची कर्नाटकात मैत्री नाही

Next

बेंगळुरु- सत्ताधारी भाजपाविरोधात दुसरी आघाडी, तिसरी आघाडी उघडणाऱ्या विरोधकांच्या भूमिकेत सलग दोन तीन महिने सातत्य राहात नसल्याचे कर्नाटक विधानसभा निवडणुकीवरुन दिसत आहे. उत्तर प्रदेशात अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांचा विजयरथ रोखण्यासाठी गेली अनेक वर्षे एकमेकांचे विरोधक असणारे समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या मायावती एकत्र आल्या खऱ्या, मात्र कर्नाटक निवडणुकीत ते पुन्हा वेगळे झालेले दिसून येतात.

गोरखपूर आणि फुलपूर येथील पोटनिवडणुकांत एकत्र लढून भाजपाला पराभव पत्करायला लावणाऱ्या या दोन पक्षांनी कर्नाटकात स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी प्रयत्न करुनही बसपाला आपला उमेदवार विजयी करता आला नाही तेव्हापासूनच या दोघांची मैत्री फार काळ चालणार नाही असे दिसत होते. गेल्या वर्षाखेरीस सपा व बसपा गुजरात विधानसभेसाठी वेगवेगळे लढले होते तसेच उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीही ते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने काँग्रेसबरोबर आघाडी उघडली होती मात्र त्यांच्या एकत्रित प्रयत्नांनाही अपयश आले होते.

कर्नाटक निवडणुबाबतीत माहिती देताना समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी म्हणाले," आमची मैत्री केवळ फुलपूर आणि गोरखपूर पोटनिवडणुकांच्या बाबतीत होती, इतर राज्यांच्या निवडणुकांबाबतीत अद्याप निर्णय झालेला नाही. पण आम्ही एका धर्मनिरपेक्ष आघाडीची निर्मिती व्हावी या मताचे आहोत." समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह कर्नाटकात प्रचाराला येणार का याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले. 

बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी मात्र माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या जनता दल सेक्युलरबरोबर मैत्रीचा निर्णय घेतला आहे. त्यांनी म्हैसूर आणि चित्रदुर्ग येथे प्रचारसभा घेतल्या असून बेळगाव आणि बिदर येथेही त्यांच्या सभा होतील. कर्नाटकात बसपा २० जागा लढवत असून जनता दल सेक्युलरच्या मदतीने कर्नाटकात खाते उघडण्यास आपल्या पक्षाला यश मिळेल असे मायावतींना वाटते.

तर समाजवादी पक्ष  २७ जागा लढवत असून आपल्या पक्षाला कर्नाटकात यश मिळेल असा विश्वास सपाचे कर्नाटक राज्य प्रदेशाध्यक्ष राँबिन मँथ्यू यांनी व्यक्त केला. 
 

Web Title: After UP Experiment SP And BSP Not Friends In Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.