भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानं पत्रकाराला घरात घुसून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 06:23 PM2020-09-14T18:23:49+5:302020-09-14T18:25:33+5:30
जखमी पत्रकारावर रुग्णालयात उपचार सुरू
अगरताळा: त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट केल्यानं एका पत्रकारावर हल्ला झाला आहे. बिप्लव देव यांच्यावर टीका करणारा व्हिडिओ फेसबुकवर टाकल्यानं अज्ञातांनी पत्रकाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. जखमी पत्रकारावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहेत.
त्रिपुरातल्या स्थानिक माध्यमांनी कोरोना काळातल्या असुविधांच्या बातम्या प्रसारित केल्या होत्या. त्याबद्दल मुख्यमंत्री देव यांनी एका कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली होती. माध्यमांना माफ करणार नाही, असं विधान त्यांनी केलं होतं. त्यानंतर एका पत्रकारानं त्यांच्यावर टीका केली होती. त्याच पत्रकाराला मारहाण झाली आहे.
त्रिपुरातील बंगाली वर्तमानपत्राचे पत्रकार पाराशर बिस्वास यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर मात केल्यानंतर व्हिडिओद्वारे मुख्यमंत्री बिप्लव देव यांच्यावर टीका केली. मी मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो की त्यांनी पत्रकारांना धमकावू नये. मी आज हा व्हिडिओ पोस्ट करत आहे. भविष्यातही असे व्हिडीओ पोस्ट करेन असं पाराशर बिस्वास यांनी म्हटलं होतं.
पाराशर यांच्या व्हिडीओवर अनेकांनी टीका केली होती. शनिवारी काही अज्ञात व्यक्ती पाराशर यांच्या घरात घुसल्या. त्यांनी पाराशर यांना मारहाण केली. या हल्ल्यात जखमी झालेल्या पाराशर यांना आगरातळाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
भाजपा कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला असल्याचा संशय असल्याचा बंगाली दैनिकाचे संपादक सुबल डे यांनी व्यक्त केला. भाजप प्रवक्ते नंबेदु भट्टाचार्य यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले. त्यांनी या घटनेचा निषेध केला असून पोलीस योग्य तपास करत आहेत, असं सांगितलं.
फडणवीसांनी खडसेंच्या रुपात एक ओबीसी नेता संपवला; भाजपमधील वादात शिवसेनेची उडी
हाच माझा सर्वात मोठा गुन्हा; घरी परतलेल्या कंगनाचा पुन्हा मुख्यमंत्र्यांवर निशाणा