करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 12:06 PM2024-10-05T12:06:37+5:302024-10-05T12:13:20+5:30
डॉ. अंजू शर्मा या १९९१ च्या बॅचच्या गुजरात केडरच्या आयएएस अधिकारी आहेत.
अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. डॉ. अंजू शर्मा या १९९१ च्या बॅचच्या गुजरात केडरच्या आयएएस अधिकारी आहेत. आपली मेहनत, समर्पण आणि ध्येयाप्रती असलेलं वेड या गोष्टींमुळे त्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. मूळच्या राजस्थानमधील भरतपूर येथे राहणाऱ्या डॉ. अंजू स्वतःच्या चुकांमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत नापास झाल्या. पण नंतर त्या चुकांमधून शिकल्या.
वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC परीक्षा उत्तीर्ण करून त्या IAS झाल्या. अपयशातून शिकून आवश्यक बदलांसह योग्य मार्गाचा अवलंब करून ध्येयाकडे वाटचाल केल्यास यश निश्चितच मिळतं असं म्हणतात.
गुजरात केडरच्या आयएएस अधिकारी डॉ. अंजू यांनी १९९१ मध्ये राजकोटमध्ये असिस्टंट कलेक्टर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर त्यांनी गांधीनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी आणि इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. यानंतर त्या विशेष सचिव, नंतर सचिव, प्रधान सचिव आणि आता अतिरिक्त मुख्य सचिव या पदापर्यंत पोहोचल्या आहेत.
अपयशानंतरही मानली नाही हार
अंजू दहावीच्या परीक्षेत नापास झाल्या होत्या. तसेच बारावीच्या परीक्षेत त्या अर्थशास्त्र विषयात पास होऊ शकल्या नाहीत. मात्र, या अपयशासमोर त्यांनी हार मानण्यास नकार दिला आणि पुन्हा एकदा अभ्यास करून, पूर्ण लक्ष केंद्रित करून सुवर्णपदक मिळवलं. जयपूर येथून बीएससी आणि एमबीए पूर्ण करून युपीएससीची तयारी सुरू केली. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.
अंजू म्हणतात की, परीक्षेला बसण्यासाठी शेवटच्या क्षणाच्या तयारीवर कोणीही अवलंबून राहू नये. याचं कारण असं की जोखीम जास्त असते. तयारीसह उजळणी करण्याची संधी कमी असते. दहावी आणि बारावीमध्ये चुका झाल्या. त्यामुळे यूपीएससीच्या तयारीसाठी योग्य रणनीती आखली आणि अभ्यास केला. त्या आयएएस टॉप स्कोरर बनल्या.