मोदींना अपयश, अखेर टीडीपीच्या दोन्ही मंत्र्यांनी दिले राजीनामे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 21:31 IST2018-03-08T21:31:32+5:302018-03-08T21:31:32+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेरचा प्रयत्न म्हणून आज दुपारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा केली

मोदींना अपयश, अखेर टीडीपीच्या दोन्ही मंत्र्यांनी दिले राजीनामे
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष दर्जा न दिल्याने नाराज चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पक्षाने (टीडीपी) केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत टीडीपीचे दोन्ही मंत्री वाय. एस. चौधरी आणि अशोक गजपती राजू यांनी आपले राजीनामे पंतप्रधानांकडे सोपवले. या कृतीनंतर अखेर तेलुगू देसमला केंद्र सरकारमध्ये थांबवण्यात सरकारला अपयश आले आल्याचे सिद्ध झाले आहे.
यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेरचा प्रयत्न म्हणून आज दुपारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा केली. यानंतर तेलुगु देसमचे दोन मंत्री मंत्रिमंडळात राहतील असे मानले जात होते. मात्र पंतप्रधानांच्या प्रयत्नांना यश आले नाही. विशेष म्हणजे आंध्र प्रदेश सरकारमध्ये सहभागी झालेल्या भाजपच्या दोन मंत्र्यांनीही राजीनामे दिले आहेत.