विनोद खन्नांच्या अंत्यसंस्कारानंतर बॉलिवूडवर संतापले ऋषी कपूर

By Admin | Published: April 28, 2017 05:17 AM2017-04-28T05:17:00+5:302017-04-28T06:57:35+5:30

विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर गुरूवारी अंत्यसंस्कार झाल्यानंतर अभिनेता ऋषी कपूर यांनी बॉलिवूडच्या नव्या पिढीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

After the funeral of Vinod Khanna, Rishi Kapoor, angry with Bollywood | विनोद खन्नांच्या अंत्यसंस्कारानंतर बॉलिवूडवर संतापले ऋषी कपूर

विनोद खन्नांच्या अंत्यसंस्कारानंतर बॉलिवूडवर संतापले ऋषी कपूर

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर गुरूवारी अंत्यसंस्कार झाल्यानंतर अभिनेता ऋषी कपूर यांनी बॉलिवूडच्या नव्या पिढीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी बॉलिवूडच्या नव्या पिढीची उपस्थिती नगण्य होती आणि त्यामुळे संतापलेल्या ऋषी कपूर यांनी ट्विटरद्वारे आपला राग व्यक्त केला.   
 
""नव्या पिढीचा एकही अभिनेता वा अभिनेत्री विनोद खन्नांच्या अंत्यसंस्कारावेळी  नव्हता ... हे लाजिरवाणं आहे... काहींनी तर त्यांच्यासोबत कामही केलं आहे... दुसऱ्याचा आदर करायला शिकलं पाहिजे... असं का? माझ्यावेळेसही कुणी खांदा देण्यास येणार नाही अशी मी स्वतःच्या मनाची तयारी करायला हवी....स्वतःला स्टार म्हणवून घेणा-यांचा आज खूप राग आला आहे... काल रात्री प्रियंका चोप्राच्या पार्टीमध्ये कितीतरी "चमचा" लोकांना भेटलो... इथे मात्र त्यातले काहीच जणं होते..."" असे सलग तीन ट्विट ऋषी कपूर यांनी केले. तर आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी रणबीर कपूर देशाबाहेर असल्याने उपस्थित राहू शकला नसल्याचं स्पष्टीकरण दिलं.
 
विनोद खन्नांच्या मृत्यूच्या एकदिवस आधी प्रियंका चोप्राच्या घरी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यापार्टीत, कंगना रनौत, तमन्ना भाटिया, सोफी चौधरी, फरहा अली खान, सुष्मिता सेन, ईशा गुप्ता, कुणाल कोहली, अब्बास-मस्तान, ओमंग कुमार, ऋषी कपूर, अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि पती श्रीराम नेने, आशुतोष गोवारीकर, रमेश तौरानी, सुभाष घई आणि विधू विनोद चोप्रा आदी कलाकारांनी उपस्थिती लावली होती.
 
बॉलिवूडच्या नव्या पिढीशिवाय ऋषी कपूर यांचा इशारा शाहरूख खान, सलमान खान, प्रियंका चोप्रा अशा दिग्गजांकडे असण्याचीही शक्यता आहे.  
 खलनायक म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत नायक बनून चित्रपटांचा पडदा गाजविणारे, आत्मशोधार्थ संन्यास घेऊन सर्वांना चकित करणारे आणि राजकीय क्षेत्रावरही आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना (७०) काळाच्या पडद्याआड गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोकसहवेदना व्यक्त केली. गुरुवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास एका खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात अक्षय, राहुल, साक्षी आणि मुलगी श्रद्धा तसेच पहिली पत्नी गीतांजली आणि दुसरी पत्नी कविता असा परिवार आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी बॉलीवूडसह राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.रुपेरी पडदा गाजविणारे आणि ‘आॅल टाइम हॅण्डसम’ अशी ओळख असलेले विनोद खन्ना यांच्यावर गिरगाव येथील एचएन रिलायन्स फाउंडेशन अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर येथे उपचार सुरू होते. १९६८ ते २०१३ या कालावधीत त्यांनी १४१ चित्रपटांत काम केले. ‘दयावान’सह अमर अकबर अँथोनी, द बर्निंग ट्रेन, मेरे अपने, मेरा गाव मेरा देश, गद्दार, जेलयात्रा, इन्कार, कुर्बानी, कुदरत यांतील भूमिका विशेष गाजल्या. चित्रपटसृष्टीत कारकिर्द बहरत असतानाच १९८२ मध्ये त्यांनी अचानक चित्रपटसृष्टीला सोडचिठ्ठी देऊन ओशोंचे आश्रम गाठले. आत्मशोध आणि आत्मशांतीसाठी आपण संन्यास घेतल्याची त्यांनी घोषणा करताच चित्रपटसृष्टीला धक्का बसला. मात्र, पाच वर्षाच्या कालावधीत संन्याशाची वस्त्रे उतरवून त्यांनी सिनेसृष्टीत पुनरागमन केले. विनोद खन्ना यांनी बॉलिवूडबरोबरच राजकारणातही ठसा उमटविला होता. १९९८ साली पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून ते भाजपाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते. अटलिबहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात २००२मध्ये सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री होते. परराष्ट्र खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. २००९चा अपवाद वगळता १९९८, २००४ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले.
 
विनोद खन्ना यांच्या निधनाने बॉलीवूडवर शोककळा पसरली. निर्माता करण जोहर याने ‘बाहुबली २’ चा प्रिमियर रद्द केला, तर महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन गुंडाळून रुग्णालयाकडे धाव घेतली. खन्ना यांच्या पार्थिवावर वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा साक्षी याने त्यांच्या पार्थिवाला अग्नि दिला. यावेळी महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, गुलजार, कबीर बेदी, रंजित, सुभाष घई, ऋषी कपूर, रणधीर कपूर, दिया मिर्जा, रणदीप हुड्डा, चंकी पांडे, उदित नारायण, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
 

Web Title: After the funeral of Vinod Khanna, Rishi Kapoor, angry with Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.