गौतम गंभीरपाठोपाठ व्यंकटेश प्रसादकडून नुपूर शर्मांचा बचाव, फाशीची मागणी करण्याऱ्यांवर केली टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 11:53 AM2022-06-13T11:53:34+5:302022-06-13T11:54:08+5:30
Nupur Sharma News: मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात देशभरात तीव्र आंदोलन होत आहे. दरम्यान, गौतम गंभीर पाठोपाठ माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी नुपूर शर्मा यांचा बचाव केला आहे.
बंगळुरू - मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात देशभरात तीव्र आंदोलन होत आहे. दरम्यान, गौतम गंभीर पाठोपाठ माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी नुपूर शर्मा यांचा बचाव केला आहे. बेळगावमध्ये मशिदीबाहेर नुपूर शर्मांच्या पुतळ्याला फाशी देऊन त्यांना फाशी देण्याच्या करण्यात आलेल्या मागणीवर प्रसाद यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हा २१ व्या शतकातील भारत आहे, यावर विश्वास बसत नाही, असे व्यंकटेश प्रसाद याने म्हटले आहे. त्यानंतर लोकांनी त्यांना ट्विट करण्यास सुरुवात केल्यावर त्यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.
व्यंकटेश प्रसाद यांनी फाशी दिलेला फोटो ट्विट करत लिहिले की, हा कर्नाटकमध्य लटकवलेला नुपूर शर्मांचा पुतळा आहे. हा २१ व्या शतकातील भारत आहे, यावर विश्वास बसत नाही. मी सर्वांना विनंती करतो की राजकारण सोडा आणि विचारी बना, त्याची अधिक गरज आहे.
त्यानंतर त्यांनी लिहिले की, या ट्विटचा जो अर्थ आहे तो अविश्वनीय आहे. या परिस्थितीसाठी वृत्तवाहिन्यांसह अशा प्रकारांना योग्य ठरवणारे जबाबदार आहेत. तसं पाहायला गेलं तर हा केवळ पुतळा नाही तर कुठल्याही शब्दांविना एकापेक्षा अधिक लोकांसाठी धोका आहे.
त्यांनी पुढे लिहिले की, दोन चुकीच्या गोष्टींमुळे एक बरोबर गोष्ट होत नाही. मात्र बहुसंख्य लोकसंख्या एवढी असुरक्षित वाटून घेते, एवढा दुसरा देश मला माहिती नाही. प्रत्येकाचं संरक्षण करण्याची गरज आहे. मात्र प्रचार प्रसारासाठी हे ब्रेनवॉश थांबवण्याची गरज आहे. सहिष्णुता दुहेरी मार्ग आहे. दरम्यान, काही जणांनी व्यंकटेश प्रसाद यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही त्यांची प्रत्युत्तर दिले.