जिद्दीला सलाम! बाळाला जन्म देऊन रुग्णवाहिकेतूनच 'ती' पोहोचली परीक्षा केंद्रावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 11:04 AM2023-02-24T11:04:11+5:302023-02-24T11:04:29+5:30
रुक्मिणीने गेल्या मंगळवारी बिहार बोर्डाची गणिताची परीक्षा दिली आणि रात्री प्रसुती वेदना सुरू झाल्या. पण, तरीही तिने दुसऱ्या दिवशी परीक्षा द्यायचे ठरवले.
बांका - लग्नानंतर शिक्षण सोडणाऱ्या महिलांसाठी बिहारमधील रुक्मिणी कुमारी (२२) एखाद्या रोल मॉडेलप्रमाणे समोर आली आहे. रुग्णालयात असह्य प्रसुती वेदना आणि बाळाला जन्म दिल्यानंतर ३ तासांत ती रुग्णवाहिकेतूनच थेट १०वीच्या बोर्ड परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचली.
रुक्मिणीने गेल्या मंगळवारी बिहार बोर्डाची गणिताची परीक्षा दिली आणि रात्री प्रसुती वेदना सुरू झाल्या. पण, तरीही तिने दुसऱ्या दिवशी परीक्षा द्यायचे ठरवले. “शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी मिळवायची” असे तिने आधीपासूनच ठरवले होते. बुधवारी विज्ञानाच्या परीक्षेसाठी ३ तास अगोदर परीक्षा हॉलमध्ये गेली. थोड्या वेळात प्रसुती वेदना असह्य झाल्याने तिने अधिकाऱ्यांना सांगितले, मग तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आले. सुदृढ मुलाला जन्म दिल्यानंतर रुक्मिणीने अधिकाऱ्यांना परीक्षेला बसण्याची विनंती केली. तिची जिद्द बघून तिला घाईघाईत परवानगी देण्यात आली. ती परत परीक्षा केंद्राकडे धावली. पेपर पूर्ण केला आणि नंतर एक आई तिच्या नवजात बाळाकडे परतली. आता तिच्या जिद्दीची कहाणी व्हायरल होत असून, कौतुकाचा वर्षाव होत आहे.