CoronaVirus: गोव्यानंतर आणखी एक राज्य कोरोनामुक्त; छोट्या राज्यातून आली मोठी बातमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 01:33 AM2020-04-21T01:33:06+5:302020-04-21T06:45:10+5:30
संपूर्ण ईशान्य भारतात आजघडीला एकही नवा रुग्ण नाही
इम्फाळ : मणिपूर राज्य कोरोना संसर्गापासून मुक्त झाल्याची अतिशय आनंदाची बातमी मुख्यमंत्री एन. बिरेनसिंह यांनी सोमवारी साऱ्या देशाला दिली. या राज्यात असलेले कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले दोन रुग्ण उपचारानंतर पूर्ण बरे झाल्याचेही त्यांनी सांगितले.
ईशान्य भारतामध्ये कोरोनाचा फैलाव कमी झाला असून तिथे सोमवारपासून काही ठिकाणी लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले. आसाममध्ये गेल्या आठवड्याच्या अखेरीपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ३४ झाली असून, त्यातील एक जण मरण पावला. या राज्यातील कोरोना रुग्णांपैकी १७ जण उपचारानंतर पूर्ण बरे झाले आहेत. उर्वरित रुग्णांनाही त्यांची प्रकृती ठीक होताच रुग्णालयातून घरी पाठविले जाईल.
रुग्णाने प्रवासाची माहिती लपविली
गेल्या महिन्यात चीनमधून आसाममध्ये परतलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. या विदेश प्रवासाची माहिती दडवून ठेवल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला १४ दिवस क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. ईशान्य भारतातील कोरोनाचा पहिला रुग्ण मणिपूरमध्येच आढळून आला होता. या व्यक्तीने कोलकाता व इम्फाळ येथे वास्तव्य केले होते. त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे २५ मार्च रोजी वैद्यकीय चाचणी अहवालातून स्पष्ट झाले. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या किती जण संपर्कात आले होते याचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांचीही वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. या राज्यात सुदैवाने कोरोनाचे दोनच रुग्ण आढळून आले होते.
सर्वांचे सहकार्य, नियमांच्या पालनामुळे यश
मणिपूरमध्ये रविवारपासून कोरोना विषाणूचे नवे रुग्ण आढळून आलेले नाहीत. केवळ मणिपूरच नव्हे तर ईशान्य भारतातील इतर सात राज्यांत एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. जनतेने दिलेले सहकार्य व डॉक्टर, अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घेतलेले परिश्रम व लॉकडाऊनच्या नियमांची केलेली कडक अंमलबजावणी यामुळेच मणिपूर कोरोना विषाणूमुक्त होऊ शकले.
-एन. बिरेनसिंह, मुख्यमंत्री, मणिपूर