दिल्लीत सरकार स्थापनेवरून भाजपात काथ्याकूट
By Admin | Published: July 21, 2014 02:16 AM2014-07-21T02:16:47+5:302014-07-21T02:16:47+5:30
सुमारे तासभर चाललेल्या या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना उपाध्याय यांनी सांगितले की, सरकार स्थापनेसाठी आम्हाला तूर्तास कुठलेही निमंत्रण आलेले नाही़ जे काही होईल
नवी दिल्ली : दिल्लीत सरकार स्थापनेसाठी भाजपात काथ्याकूट सुरूच असून याच प्रयत्नांतर्गत आज रविवारी राज्याचे नवनियुक्त पक्ष प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली़ दिल्लीत सरकार स्थापण्याचे फार मोठे आव्हान नाही, हे त्यांनी राजनाथसिंह यांना सांगितल्याचे समजते़
सुमारे तासभर चाललेल्या या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना उपाध्याय यांनी सांगितले की, सरकार स्थापनेसाठी आम्हाला तूर्तास कुठलेही निमंत्रण आलेले नाही़ जे काही होईल, राज्यघटनेच्या चौकटीत केले जाईल़ नायब राज्यपालांकडून सरकार स्थापनेचे निमंत्रण मिळालेच तर आम्ही पुढील निर्णय घेऊ़
विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाला आणखी पाच आमदारांची गरज आहे़ हा आकडा कसा जमवणार? असे विचारले असता, त्यांनी थेट उत्तर देणे टाळले़ सत्ता स्थापनेचे निमंत्रण मिळाल्यानंतरच भाजपा या प्रश्नाचे उत्तर देईल, असे ते म्हणाले़
७० सदस्यीय दिल्ली विधानसभेत भाजपाला ३१ आणि भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलास १ अशा ३२ जागा मिळाल्या आहेत़ तर आम आदमी पार्टीला २८, काँग्रेसला ८ तसेच अपक्ष आणि जदयूला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे़ भाजपाच्या ३१ आमदारांपैकी तीन आमदार लोकसभेवर निवडून गेल्याने तीन जागा रिक्त झाल्या आहेत़ त्यामुळे आता ६७ आमदार राहिल्याने सत्तास्थापनेसाठी भाजपाला ३४ जागा हव्या आहेत़ (लोकमत न्यूज नेटवर्क)