हसन अलीनंतर ‘ईडी’ आता कुरेशीच्या मागे

By Admin | Published: March 24, 2016 12:45 AM2016-03-24T00:45:40+5:302016-03-24T00:45:40+5:30

संपुआ सरकारच्या दहा वर्षांच्या राजवटीत गाडण्यात आलेल्या जुन्या प्रकरणांशी संबंधित सर्व फायलींवरील धूळ झटकण्याचे काम मोदी सरकारने सुरू केले आहे.

After Hassan Ali, 'ED' is now behind Qureshi | हसन अलीनंतर ‘ईडी’ आता कुरेशीच्या मागे

हसन अलीनंतर ‘ईडी’ आता कुरेशीच्या मागे

googlenewsNext

हरीश गुप्ता, नवी दिल्ली
संपुआ सरकारच्या दहा वर्षांच्या राजवटीत गाडण्यात आलेल्या जुन्या प्रकरणांशी संबंधित सर्व फायलींवरील धूळ झटकण्याचे काम मोदी सरकारने सुरू केले आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गेल्या महिन्यात पुण्यातील घोडे व्यापारी हसन अली यांच्याशी संबंधित करचोरी आणि हवाला व्यवहाराबद्दलच्या प्रकरणांच्या फायली पुन्हा उघडल्या होत्या आणि आता दिल्लीतील मांस निर्यातदार मोईन अख्तर कुरेशी हे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत.
ईडीने पुन्हा एकदा हसन अलींच्या पुणे आणि अन्य शहारांमधील प्रतिष्ठानांवर छापे घातले आहेत. ईडीचे संचालक कर्नल सिंग यांनी ईडीच्या प्रादेशिक प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या सर्व प्रकरणांच्या फायलींवरील धूळ झटकण्याचे निर्देश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. यासोबतच अनेक काँग्रेस नेत्यांसोबत निकटचे संबंध असलेले मोईन अख्तर कुरेशी यांच्याविरुद्धच्या सर्व प्रकरणांचा पुन्हा तपास करण्याचा निर्णय आयकर विभाग आणि ईडीने घेतल्याचे समजते. आयकर विभागाने करचोरीच्या संदर्भात दंड आकारण्याबाबतची नोटीस जारी केली होती; परंतु नंतर या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात आला नाही. एवढेच नव्हे तर कुरेशी यांची साधी चौकशीही करण्यात आली नाही.
डून स्कूलचे माजी विद्यार्थी असलेले ५७ वर्षीय कुरेशी हे करचोरी आणि आपल्या कंपन्यांची उलाढाल कमी दाखविण्याच्या संदर्भात दीर्घकाळापासूनच आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आयकर विभागाने केवळ कुरेशी यांनाच नव्हे, तर सीबीआयचे माजी संचालक ए. पी. सिंग आणि त्यांच्या पत्नीला कारणे दाखवा नोटीस जारी करणे हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. कुरेशी हे ए. पी. सिंग यांच्या पत्नीचे नातेवाईक आहेत.
कुरेशी यांच्या निवासस्थान व कार्यालयांवर छापे घालण्यात आल्यानंतर आयकर विभागाने त्यांची रोख, दागिने आणि बँकेतील जमाठेवींसह २० कोटींची संपत्ती गोठवली होती. सिंग आणि कुरेशी यांच्या दरम्यान झालेल्या दूरध्वनीवरील आणि मोबाईलवरील संभाषणाचा विस्तृत तपशीलही आपण मिळविल्याचा दावा आयकर विभागाने केला आहे.

Web Title: After Hassan Ali, 'ED' is now behind Qureshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.