पायाखालची माती घेण्यासाठी धावले अन्...; भाेलेबाबांसाठी लोकांनी एकमेकांना पायदळी तुडविले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 08:54 AM2024-07-03T08:54:11+5:302024-07-03T08:56:29+5:30

नजर जाईल तिथे मृतदेहच; नातेवाइकांचा काळीज चिरणारा आक्रोश

After hathras satsang stampede, there was a commotion across the country | पायाखालची माती घेण्यासाठी धावले अन्...; भाेलेबाबांसाठी लोकांनी एकमेकांना पायदळी तुडविले

पायाखालची माती घेण्यासाठी धावले अन्...; भाेलेबाबांसाठी लोकांनी एकमेकांना पायदळी तुडविले

हाथरस/एटा : सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. सत्संग झाल्यानंतर भाविकांना भाेलेबाबांची झलक पाहायची हाेती.  भाविकांना भाेलेबाबांच्या पायाखालील माती हवी हाेती. त्यासाठी भाविकांनी त्यांच्यामागे धाव घेतली. त्यावेळी चेंगराचेगरी झाली आणि १०० पेक्षा जास्त लाेकांचा मृत्यू झाला. 

चेंगराचेंगरी का झाली, याचा तपास करण्यात येत आहे. काेणतीही अफवा उडाली नव्हती. उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार यांनी चेंगराचेंगरीमागील शक्यता सांगितली. ते म्हणाले, भाविकांनी बाबांच्या पायाखालची माती घेण्यासाठी धाव घेतली. गर्दीवर नियंत्रणसाठी पाण्याचा मारा करण्यात आला. त्यामुळे लाेक सैरावैरा हाेऊन धावले आणि घसरून पडले. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सुरक्षारक्षकांनी लाेकांना थांबवून ठेवले हाेते. 

भाेलेबाबांचा ताफा निघून गेल्यानंतर सर्वांना बाहेर जाण्यासाठी साेडले. बराच वेळ तिथे थांबल्यामुळे लाेकांचा श्वास काेंडायला लागला हाेता. लहान मुले रडायला लागली. बाहेर पडण्याची सूचना मिळताच सर्वजण दाराकडे धावले. दार लहान हाेते आणि त्यामुळे माणसांचे लाेंढेच दारावर धडकले. त्यातून धक्काबुक्की झाली आणि अनेक जण खाली पडले. कशाचाही विचार न करता लाेक खाली पडलेल्यांना पायदळी तुडवत निघत हाेते. घटनास्थळी चित्र एवढे भीषण हाेते की, नजर जाईल तिथे मृतदेहच दिसत हाेते. लाेकांच्या किंकाळ्या ऐकून आसपासचे लाेक मदतीसाठी धावले. जखमींना बस-टेम्पाेसह मिळेल त्या वाहनाने एटा येथील रुग्णालयात नेण्यात आले. अनेकजणांचा वाटेतच श्वास थांबला. दरम्यान, या प्रकरणी चाैकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.

 भाविकांचा मृत्यू वेदनादायी आहे. ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य गमाविले त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करते. जखमींनी लवकर बरे हाेण्याची प्रार्थना करते. - द्राैपदी मुर्मू, राष्ट्रपती 

आपल्या जवळच्या लाेकांना ज्यांनी गमाविले अशा सर्व कुटुंबांबद्दल मी संवेदना व्यक्त करताे. सरकारने संवेदनशीलतेने सर्वांची मदत करायला हवी. - राहुल गांधी, विरोधी पक्षनेते

सरकारला आयाेजनाची माहिती असूनही एवढी माेठी घटना हाेणे अतिशय दु:खद आहे. सुरक्षा आणि व्यवस्थेसाठी सरकारने काय केले, हा माेठा प्रश्न उपस्थित हाेताे. या घटनेसाठी काेणी जबाबदार असेल तर ते सरकार आहे. - अखिलेश यादव, खासदार, यूपी

यापूर्वीही घटना घडल्या, पण...
याआधीही उत्तर प्रदेशात धार्मिक कार्यक्रमांदरम्यान अशा घटना घडल्या आहेत. प्रतापगड येथील कृपालू महाराज आश्रमातही अशीच घटना घडली. त्यावेळी आश्रमात आयोजित भंडारादरम्यान कपडे व खाऊचे वाटप केले जात होते, त्यासाठी त्यावेळी सुमारे आठ हजार लोक जमले होते. त्यादरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि ३०हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही अशा घटनांमधील चेंगराचेंगरी पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. दरवर्षी कुठे ना कुठे अशी घटना घडत असते.

सगळीकडे मृतदेह अन् आक्रोश
यावेळी मिळेल ते वाहन वापरण्यात आले. रुग्णालयाबाहेर सगळीकडे उघड्यावर मृतदेह ठेवण्यात आले होते. परिस्थिती इतकी भीषण होती की, कोणालाच काही समजत नव्हते. कुटुंबीय आपल्या नातेवाइकांचा शोध घेत होते. ते सापडत नसल्याने त्यांनी काळीज चिरणारा आक्रोश फोडला होता. त्यांच्या रडण्याने येथील परिस्थिती भेदरून जाणारी होती.

आयाेजकांनी जबाबदारी ढकलली
आयाेजन समितीचे महेश चंद्र यांनी सांगितले की, आम्ही जिल्हा प्रशासनाची परवानगी घेतली हाेती. १२ हजारांपेक्षा जास्त सेवादार हाेते. मात्र, प्रशासनाकडून काेणतीही सुविधा नव्हती. घटनास्थळी रुग्णवाहिकादेखील नव्हती. लाेक एकमेकांवर पडले, तेव्हा त्यांना सांभाळायला काेणीच नव्हते.

मृतदेह पाहताच ढसाढसा रडले 
सिकंदराराउ रुग्णालयाबाहेर एक वडील आपल्या मुलीचा शोध घेत होते. तिथे आपल्या मुलीचा मृतदेह पाहिल्यावर ते ढसाढसा रडू लागले. हे काय घडले असे म्हणत ते आक्रोश करत होते.

Web Title: After hathras satsang stampede, there was a commotion across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.