ब्रिटीश पंतप्रधानांच्या असमर्थतेनंतर आता या देशाचे राष्ट्रपती असतील प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी
By बाळकृष्ण परब | Published: January 10, 2021 03:32 PM2021-01-10T15:32:08+5:302021-01-10T17:20:41+5:30
Republic Day Update : ब्रिटनमध्ये झालेल्या कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनच्या प्रकोपानंतर जॉन्सन यांनी भारत दौऱ्यावर येण्यास असमर्थता व्यक्त करत, दौरा रद्द केला होता. त्यानंतर आता प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी नव्या प्रमुख पाहुण्यांचे नाव निश्चित झाले आहे.
नवी दिल्ली - यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. मात्र ब्रिटनमध्ये झालेल्या कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनच्या प्रकोपानंतर जॉन्सन यांनी भारत दौऱ्यावर येण्यास असमर्थता व्यक्त करत, दौरा रद्द केला होता. त्यानंतर आता प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी नव्या प्रमुख पाहुण्यांचे नाव निश्चित झाले असून, सुरिनामचे राष्ट्रपती चंद्रिकाप्रसाद संतोखी हे प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख अतिथी म्हणून भारत दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान कार्यालयामधील सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
चंद्रिकाप्रसाद संतोखी हे भारतीय वंशाचे असून, हल्लीच त्यांनी सुरीनामच्या राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतली होती. विशेष बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या आपल्या संबोधनामध्येही चंद्रिकाप्रसाद संतोखी यांचा विशेष उल्लेख केला होता. संतोखी यांचे पूर्वज शेकडो वर्षांपूर्वी भारतातून दक्षिण अमेरिकेत गेले होते.
याआधी इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. जॉन्सन यांनीही या निमंत्रणाचा स्वीकार केला होता. मात्र डिसेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रकोप वाढल्याने लॉकडाऊन करावा लागला आहे. त्यामुळे देशातील परिस्थिती पाहून जॉन्सन यांनी भारत दौऱ्यावर येण्यास असमर्थता दर्शवली.