लडाखमधील घुसखोरीनंतर आता पँगाँग सरोवराजवळ चिनी सैनिकांनी केले असे कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 03:56 PM2020-06-30T15:56:04+5:302020-06-30T15:58:15+5:30
भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. दोन्ही देशांचे सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आमने-सामने आलेले आहे. तर एकमेकांना कुटनीतीच्या माध्यमातून नामोहरम करण्यासाठी दोन्ही देशांचे सरकार प्रयत्नशील आहे.
लेह (लडाख) - लडाखमध्ये चिनी सैनिकांकडून सातत्याने चाललेला घुसखोरीचा प्रयत्न आणि गलवान खोऱ्यात चिनी सैनिकाशी झालेल्या झटापटीत भारताच्या २० जवानांना आलेले वीरमरण यामुळे सध्या भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. दोन्ही देशांचे सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आमने-सामने आलेले आहे. तर एकमेकांना कुटनीतीच्या माध्यमातून नामोहरम करण्यासाठी दोन्ही देशांचे सरकार प्रयत्नशील आहे. मात्र असे असले तरी नियंत्रण रेषेवर असलेल्या चिनी सैन्याकडून रोज नव्या उचापती सुरू आहेत.
पँगाँग सरोवर परिसरात फिंगर ४ पर्यंत घुसलेल्या चिनी सैन्याने सरोवराच्या काठावर तळ ठोकला असून, तिथे चिनी सैन्याने एक मंदारीन प्रतीक चिन्ह आणि चीनचा नकाशा तयार केला आहे. चिनी सैन्याने हे कोरीवकाम फिंगर ४ आणि फिंगर ५ दरम्यान केले आहे. याची लांबी तब्बल ८१ मीटर आणि रुंदी सुमारे २५ मीटर आहे. तसेच ही चिन्हे एवढी मोठी आहेत की, ती सॅटेलाइट फोटोमध्येही स्पष्टपणे दिसून येत आहेत. दरम्यान, तिबेटमध्ये असलेले चिनी सैन्याचे ओव्हरऑल कमांडर वँग हायजँग यांचा एक फोटो नुकताच समोर आला होता. त्या ते भारत आणि चीनच्या सीमेवर लिहिलेले चीनचे नाव रंगवताना दिसत होते.
लडाखमधील पँगाँग सरोवरामधून भारत आणि चीनची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा जाते. या सरोवराला लागून असलेल्या फिंगर १ ते ८ पर्यंत आपला हक्क आहे असा भारताचा दावा आहे. तर चीन हल्ली फिंगर आठ ते चार पर्यंत आपला दावा सांगू लागला आहे. तसेच सध्या फिंगर ४ जवळ दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आलेले आहे. येथेच मे महिन्यामध्ये चिनी सैन्य आणि भारताच्या जवानांमध्ये झटापटी झाल्या होत्या. त्यावेळी चिनी सैनिकांनी काटेरी तारा गुंडाळलेले रॉड आणि सळ्यांनी भारतीय जवानांवर हल्ला केला होता.
सध्या फिंगर ४ पर्यंत चिनी सैन्य मोठ्या प्रमाणात तैनात असून, त्यांच्याकडून भारतीय जवानांना फिंगर आठपर्यंत गस्त घालण्यापासून रोखण्यात येत आहे. तसेच या भागात चिनी सैन्याकडून मोठ्या प्रमाणावर स्थायी आणि अस्थायी बांधकाम झाल्याचे छायाचित्रांमधून दिसत आहे.