जाट आरक्षण आंदोलनानंतर पोलीस उपायुक्तांची शुट अॅट साईटची ऑर्डर
By admin | Published: February 20, 2016 07:46 PM2016-02-20T19:46:39+5:302016-02-20T20:38:34+5:30
जाट आरक्षण आंदोलनावरुन चिघळलेलं वातावरण अजून चिघळत चाललं आहे. हरियाणामधील हिस्सार आणि हंसी येथे पोलिसांनी शुट अॅट साईडटची ऑर्डर दिली आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
चंदिगड, दि. 20 - जाट आरक्षण आंदोलनावरुन चिघळलेलं वातावरण अजून चिघळत चाललं आहे. हरियाणामधील हिस्सार आणि हंसी येथे पोलिसांनी शुट अॅट साईडटची ऑर्डर दिली आहे. कर्फ्यू लावलेला असतानादेखील अनेक ठिकाणी हिंसा झाली आहे. आंदोलनकर्त्यांनी जिंद जिल्ह्यातील रेल्वे कार्यालय जाळलं तर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही रोखून धरली होती. पोलिसांसोबत खाजगी वाहनांचीदेखील तोडफोड करण्यात आली आहे. कार्यालय तसंच हंसी येथील टोलनाक्याची जाळपोळदेखील केली आहे. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांविरोधात 129 गुन्हे दाखल केले आहेत. कॅबिनेट सचिव पी के सिन्हा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कायदा - सुव्यवस्थेची माहिती घेतली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराने शनिवारी कर्फ्यू लागू करण्यात आलेल्या ठिकाणी फ्लॅग मार्चदेखील काढला होता. रोहतकला जाणारे सर्व मार्ग बंद असल्याने लष्कराला हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली. आंदोलनकर्त्यांनी दिल्ली, हिसार, रोहतक आणि फाजीलका हायवे पुर्णपणे बंद केले आहेत. हरियाणामधील 9 जिल्ह्यांत लष्कराच्या 33 तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत.
ज्या ठिकाणी परिस्थिती बिघडली आहे त्या ठिकाणी फ्लॅग मार्च सुरु आहेत, परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल असा विश्वास डीजीपी य़शपाल सिंघल यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पुन्हा नव्याने लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे.
दिल्लीत भासू शकतो आवश्यक वस्तूंचा तुटवडा -
जाट आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग ब्लॉक केले असल्यामुळे याचा फटका राजधानी दिल्लीलादेखील मोठ्या प्रमाणात पडत आहे. आंदोलन जर असेच सुरु राहिले तर दिल्लीला आवश्यक गोष्टींचा तुटवडा भासू शकतो, ज्यामुळे फळ, भाज्यांच्या किंमती येणा-या दिवसांत वाढू शकतात. दिल्लीला फळ, भाज्या तसंच महत्वाच्या गरजू गोष्टींची आय़ात करण्यासाठी ज्या राष्ट्रीय महामार्गांचा वापर केला जातो ते सर्व हरियाणातूनच येत असल्याने दिल्लीला याचा मोठा फटका बसू शकतो
आंदोलनात 5 जणांचा मृत्यू -
आंदोलनात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. रोहतक आणि झज्जरमध्ये सुरक्षा जवानांनी केलेल्या फायरिंगमध्ये शनिवारी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. आंदोलनाच मुख्य केंद्र असलेल्या हरियाणामधून हे आंदोलन इतर जिल्ह्यांमध्ये पसरत आहे. हरियाणामधील अजून 5 जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. ज्यामध्ये जिंद, हिसार आणि हंसी या जिल्ह्यांचा समावेश आहे. याअगोदर सोनीपत आणि गोहानामध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.